बीड - जिल्ह्याच्या परळी मतदारसंघातील लढत लक्षवेधी असून धनंजय मुंडे आणि पंकजा यांच्यातील वैयक्तिक टीका टीपण्णी यंदाच्या प्रचारात महत्त्वाचा मुद्दा ठरला. परळी मतदारसंघात आणि बीड जिल्ह्यात या नेत्यांच्या प्रचारसभेत एकमेकांना टार्गेट करण्यात आले. धनंजय मुंडेंना पंकजा यांच्या समर्थकांकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. तर, धनंजय मुंडेंनाही पंकजा यांच्या समर्थकांना ट्रोल केलंय. आपल्या प्रचाराच्या सांगता सभेत धनंजय मुंडेंनी होय, मी चोर आहे, असे म्हणत जनतेचा आशीर्वाद मला असल्याचे म्हटलंय.
हो मी चोर आहे, या माय-बाप जनतेची सेवा करून त्यांची मनं चोरली. ताईसाहेबांच्या सभेत सगळी मंडळी मला स्टेजवर शिव्या देत होती आणि माझ्या बहिणाला आनंद होत होता, याचं जास्त दु:ख झालं. मी लोकांच्या मनात निर्माण केलेले स्थान यांना संपवता येत नाही म्हणून या भावाला संपवण्याचा घाट घातला आहे, असे म्हणत धनंजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंकजा मुंडेंना लक्ष्य केलंय.
मोदींना परळीत आणून आमच्या ताईने त्यांचा अपमान केला. जेमतेम गर्दी होती. तेही 600 रूपये देऊन जमा केलेली. उदयनराजेंच्या गादीची ताकद तर मोठी आहे. त्यांची तरी सभा थोडी मोठी घ्यायची ना? हा महाराजांचा अपमान नाही का? मोठ्या मोठ्या महारथींना बोलवून त्यांचा अपमान करणं यांना शोभतं का?, असे म्हणत धनंजय यांनी पंकजा मुंडेंच्या सभेला गर्दी नसल्याचं म्हटलं. धनंजय मुंडेंची ही टीका पंकजा यांना जिव्हारी लागली. त्यामुळेच, आमचे भाऊ, मला बहिणबाई असं म्हणतात, हे सांगताना पंकजा यांना भोवळ आली होती. पंकजा यांच्यावर वैयक्तिक टीका टीपण्णी केल्याबद्दल त्यांनी राग व्यक्त केला आहे.