बीड : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी बाचाबाची झाल्यानंतर आपण त्यांना दोन चापटा मारल्याचा दावा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा शनिवारी बीडमध्ये होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी जमले होते. यावेळी जिल्हाप्रमुख (पूर्व) आप्पासाहेब जाधव व उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीवर गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जिल्हाप्रमुखांच्या गाडीची काचही फोडण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. याचवेळी जाधव व वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणे सोडविल्यानंतर दोघेही तेथून निघून गेले.
जाधव म्हणाले, अंधारेंना दोन चापटा लगावल्या सुषमा अंधारे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु याकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि अंधारे यांचे वाद झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या, अशी प्रतिक्रिया खुद्द जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दिली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी उशिरापर्यंत संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजली नाही.