पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी सोमवारी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. शरद पवारांचे नाव न घेता त्यांना भटकती आत्मा म्हटले होते. महत्वाचे म्हणजे या वक्तव्याचे पडसाद विरोधकांतून उमटत असताना अजित पवार राष्ट्रवादी गट मात्र त्याचे समर्थन करत आहे. अशावेळी आता शरद पवारांची मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आली आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. मोदी यांचा हल्ली माझ्यावर खूपच राग आहे. मी पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याचे वक्तव्य त्यांनी एका भाषणात केले होते. मात्र, आता ते महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, तो अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली ४५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करत असल्याचे, सरकार अडचणीत आणत असल्याचे म्हणत आहेत. हो माझा आत्मा भटकत आहे, अस्वस्थ आहे, पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे, असा पलटवार शरद पवारांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात गैर काय, देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना संसार चालविणे अवघड बनले आहे. त्यांच्यासाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन, असे प्रत्यूत्तर पवारांनी दिले आहे. मी तडफड करतो असे मोदी म्हणाले, होय मी लोकांचे दु:ख पाहून तडफड करतोय. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेले मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपाने आमचे घर फोडले, पक्ष फोडला. हे फोडाफोडीचे राजकारण राज्याच्या हिताचे नाही, अशी टीका पवारांनी केली.
तसेच जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. हे लोक जनतेला अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी मोदींवर केला. तसेच मोदी काल म्हणाले की ते ईडीचा एक टक्काही वापर करत नाहीत, लोकांच्या ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना तुम्ही तुरुंगात टाकताय. यामुळे आता एक टक्का म्हणा की सौ टक्का, तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेने जात आहात, असा आरोप पवार यांनी केला.