“होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 06:00 AM2023-08-18T06:00:57+5:302023-08-18T06:03:09+5:30
विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. आम्ही पारदर्शी व प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी/ कोपरगाव (जि. अहमदनगर) : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय, होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. कारण, ती खुर्ची सुरक्षित राहावी, त्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
वाकडी (ता. कोपरगाव) येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ‘फेस टू फेस पोहोचणारे हे सरकार आहे, फेसबुकवर बोलणारे हे सरकार नाही’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणालो होतो, बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली. तरीही मी परत आलोच. आता विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. आम्ही पारदर्शी व प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
सरकारचा बालदेखील बाका होणार नाही
विरोधक रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन ‘सरकार पडेल, सरकार पडेल’ म्हणायचे. त्यांचे ज्योतिषीदेखील खोटे ठरले आहेत. आता तर अजित पवार आमच्या सोबत आले आहेत. त्यामुळे ‘सरकारचा बालदेखील बाका होणार नाही’, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव आणून केंद्रातील विरोधकांनी आपले हसे करून घेतले आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
राजकीय खिचडी : अजित पवार
देश पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा नेता दिसत नाही. त्यांचे नेतृत्व संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे. अशा नेत्याला बाजूला सारण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत. त्यांच्या या राजकीय खिचडीतून काहीच साध्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.