Praful Patel ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच एका मुलाखतीदरम्यान जुने सहकारी राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा दावा केला. प्रफुल्ल पटेल हे २००४ पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असं पवार यांनी म्हटलं. पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर आता पटेल यांनीही आपण भाजपसोबत युती करण्याचा आग्रह केल्याचं मान्य केलं आहे. मात्र त्याचवेळी आपण शरद पवार यांच्यासोबत का राहिलो, याचंही स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारसाहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले," अशा शब्दांत पटेल यांनी आपली बाजू मांडली आहे.
आपली भूमिका मांडताना प्रफुल्ल पटेल यांनी पुढे लिहिलं आहे की, "हे देखील खरे आहे की, १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवारसाहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि हे ही तितकेच खरे आहे की, २००४ मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे," अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या या कबुलीनंतर शरद पवारांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.