शशी करपे,
वसई- हो, आम्ही रेती चोरी करतो. या कटात पोलीस आणि महसूल खात्याचे अधिकारीही सामील आहे. आमचा गुन्हा आम्ही कबुल करतो. पण, आमच्यासोबत महसूल आणि पोलिसांनाही सहआरोपी करा, या मागणीसाठी रेती व्यावसायिक श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वसईच्या तहसिलवर मोर्चा नेणार आहेत. यावेळी रेतीचा धंदा करण्यासाठी मदत करणाऱ्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांची नावे जाहिर केली जाणार आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन वेळा रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ३४ ट्रकवर कारवाई केली होती. त्यानंतर रेती व्यावसायिकांनी आता पोलीस आणि महसूल खात्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे वसईत नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. रेती उत्खननाची परवानगी नाकारल्याने रेती व्यवसायात असलेले भूमीपुत्र संकटात सापडले आहेत. पर्यायी रोजगार नसल्याने आणि सरकार परवानगी देत नसल्याने आम्हाला चोरी करावी लागत आहे, अशी कबुली रेती व्यावसायिकांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून दिली आहे. इतकेच नाहीतर संघटनेने रेतीची चोरटी वाहतूक करण्यासाठी कुणाला किती पैसे द्यावे लागतात याची यादी जाहिर केली आहे. मांडवी पोलीस चौकी, विरार पोलीस स्टेशन, वालीव पोलीस स्टेशन, शिरसाड ट्रॅफिक पोलीस, चारोटी ट्रॅफिक पोलीस, काशिमीरा पोलीस स्टेशन, काशिमीरा ट्रॅफिक पोलीस, दहिसर चेक नाका यांच्यासह महसूल खात्याला गाडी मागे किमान दहा हजार रुपये द्यावे लागतात, असा आरोप करण्यात आला आहे. >‘त्या’पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनाही सहआरोपी कराचोरीची वाहतूक करण्यास पोलीस आणि महसूल खाते मदत करीत असताना आरोपी मात्र रेती व्यावसायिकांनाच का करता? असा सवाल श्रमजीवी संघटनेने केला आहे. आम्ही चोरी करतो, अशी कबुली यावेळी रेती व्यावसायिक देणार आहेत. पण, या कटात सहभागी असलेल्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यासाठी कबुली मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी वेळी संबंधितांची नावे जाहिर केली जाणार, असल्याची माहिती तालुका अध्यक्ष आत्माराम ठाकरे यांनी दिली.