नाशिक : ‘होय, आम्ही पैसे घेतले. उमेदवारांच्या सार्वत्रिक प्रचारासाठी पक्षनिधी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेण्यात आले आणि त्या-त्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सदर रक्कम समाविष्ट केली जाणार आहे, असा कबुलीवजा खुलासा भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी आचारसंहिता कक्षाला पाठविला आहे. आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो, याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात लागून आहे. भाजपाने उमेदवारी वाटपात उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भाजपाच्या या व्हिडीओने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. कॉँग्रेससह शिवसेनेलाही त्यानिमित्त भाजपावर चाल करण्याची संधी मिळाली आणि दोहोंनी आचारसंहिता भंगाबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, आचारसंहिता कक्षाच्या पथकाने थेट भाजपा कार्यालयात जाऊन चौकशी केली होती, तर आचारसंहिता कक्ष प्रमुख सरिता नरके यांनी याबाबत भाजपा शहराध्यक्षांकडे खुलासा मागविला होता. सदर खुलासा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्याकडून आचारसंहिता कक्षाला प्राप्त झाला असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली. सानप यांनी उमेदवारांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतल्याचे मान्य केले आहे. सदर रक्कम ही पक्षनिधी म्हणून घेण्यात आली असून, उमेदवारांच्या एकत्रित सार्वत्रिक प्रचारासाठी तो वापरला जाणार आहे. याशिवाय, भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक खर्चातही त्याचा तपशील नमूद केला जाणार असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, रक्कम रोख अथवा धनादेश यापैकी कोणत्या स्वरूपात घेतली याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे त्या संदर्भातही माहिती मागविली जाणार असल्याचे नरके यांनी सांगितले. भाजपा शहराध्यक्षांनी पैसे घेतल्याचे मान्य केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आता काय निर्णय घेतला जातो, याबाबतची प्रतीक्षा लागून आहे.
होय, आम्ही पैसे घेतले!
By admin | Published: February 17, 2017 1:10 AM