उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कालच्या टोलमाफीच्या वक्तव्यावरून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना टोलनाक्यांवर जाण्याचे आदेश दिले होते. कार्यकर्त्यांना अडविले तर टोलनाके जाळून टाकू असा इशाराही दिला होता. परंतू, मनसे आक्रमक झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी कालच्या त्यांच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
२०१५ मध्ये आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फोर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असे फडणवीस म्हणाले होते. यावरून राज ठाकरेंनी कारचालकांकडून आजही टोल वसुली केली जात असल्याचे म्हणत मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर जातील आणि पाहणी करतील, टोल न घेता गाड्या सोडल्या जात नाहीएत. त्यांना अडविले तर टोलनाके जाळणार असल्याचे राज यांनी म्हटले होते.
यावर आता फडणवीसांचे स्पष्टीकरण आले आहे. 2015 रोजी 12 टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीच्या 53 टोलनाक्यांवर कार जीप आणि एसटीला टोल आकरला जात नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फडणवीसांचं विधान अर्धसत्य असल्याचे सांगितले. वेलणकर म्हणाले की, २०१५ साली काही टोलनाके बंद केले होते, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट दिली होती. त्यात पुणे-औरंगाबाद रोडवरील टोल आहे. परंतु सगळ्याच ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आली नाही. आजही मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई प्रवेश एन्ट्री पाँईट(वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड) त्याचसोबतचे MSRDC चे टोलनाके, मुंबई-वांद्रे सागरी महामार्ग, समृद्धी महामार्ग याठिकाणी चारचाकी वाहनांना टोल आकारला जातो असं त्यांनी सांगितले.