शनिवारी मुंब्र्यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोलिसांनी शाखेपासून काही मीटर अंतरावरच अडविले आणि माघारी पाठविले. यावरून आता शिंदे वि. ठाकरे राजकारण तापू लागले आहे. खासदार संजय राऊत यांनी डुप्लीकेट शिवसेनेने जो माज दाखवला, तो माज काल हजारो शिवसैनिकांनी उतरवला, अशा शब्दांत टीका केली आहे.
शाखा शिवसेनेची आहे आणि शिवसेना ठाकरे यांची आहे. सत्ता घटनाबाह्य मिळविली म्हणून शिवसेनेच्या शाखा त्यांच्या मालकीच्या होत नाहीत. 31 डिसेंबरनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. डुप्लीकेट शिवसेनेने जो माज दाखवला, तो माज काल हजारो शिवसैनिकांनी उतरवला. काल पोलिसांची हतबलता पाहिली, असे राऊत म्हणाले.
काल सत्तेच्या जोरावर ते फुरफुरत होते. त्यांचे काय करायचे ते पाहू नंतर परंतू यापुढे कुठल्याही शाखेवर आक्रमण किंवा अतिक्रमण केले, तर काल फक्त एक झलक होती, ट्रेलर होता. याच पद्धतीने सामुदायिकपणे तोडीस तोड उत्तर आणि प्रतिहल्ला केला जाईल. शिवसेनेच्या शाखा तुमच्या बापाच्या नाहीत, अशा शब्दांत राऊत यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
हजारो शिवसैनिकांच्या ताकतीला ते फुसका बार म्हणत आहेत. ते भाजपचे मांडलिक आहेत. भाजपच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत. तिकडे ते खोके घेऊन जाणार आहेत. चार राज्यांत प्रचाराला जाण्यापेक्षा मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या आणि इथे प्रचार करा. ही हिम्मत दाखवा. नुसते ग्रामपंचायत दाखवली, ग्रामपंचायतचे काय राजकारण सांगत आहात अभ्यास करा, असेही राऊत यांनी सुनावले.