- संकलन : नवनाथ शिंदे, अतुल मारवाडीपिंपरी : समाजातील अंधश्रद्धा संपुष्टात येण्यासाठी विविध उपाययोजना, कायदे, पथनाट्य, व्याख्यानांद्वारे जनजागृती करण्यात येत असतानाही नागरिकांच्या मनातून अंधश्रद्धा हद्दपार होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे़ जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिनानिमित्त (दि़ २१) लोकमतच्या प्रतिनिधीने पिंपरी-चिंचवड शहरातील रोप्लास चौकात लिंबू, मिरच्या, कांदा, हळद, कुं कू, दगड, लाल रंगाचे कापड असे साहित्य एकत्रित घेऊन ज्याला उतारा म्हणतात, तो चौकात ठेवून नागरिकांच्या हालचाली, प्रतिक्रिया टिपण्याचा प्रयत्न केला़ अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अनेक चालीरिती, अनिष्ट रूढी, परंपरा आजही समाजात खोलवर रुजल्याचे निदर्शनास आले. ‘लोकमत’ने हा एकत्रित केलेला प्रातिनिधिक लिंबू, मिरचीचा उतारा पिंपरी चौकात रस्त्याच्या बाजूला ठेवून सर्वेक्षण केले़ अनेकजण त्याकडे पाहून भयभीत झाले.सायंकाळी पाचच्या वेळेत कार्यालय सुटल्यामुळे घरी जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून सुरू होती़ दुचाकीचालक, रिक्षा, पादचारी, विद्यार्थी, तरुण, महिलांची गर्दी रस्त्यावरून जात होती़ दूरवरून रस्त्याने चालत येणारे नागरिक लाल रंगाच्या कापडावरील उताऱ्याचे साहित्य पाहून रस्ता बदलत बाजूने जात होते़ ज्यांना रस्त्यावर ठेवलेला उतारा दिसला नाही, अशा लोकांनी एकदम जवळ आल्यानंतर रस्त्यातील लाल कापडावरील ठेवलेले साहित्य पाहून दचकून उडी मारत रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला़ तर रिक्षाचालक, दुचाकीचालक हे ठेवलेल्या उताऱ्याला न ओलांडता बगल देत दुसऱ्या बाजूने जात होते़ वीस मिनिटांच्या कालावधीत ९७ दुचाकी, ३२ रिक्षा, २१ मोटारगाडी आणि अनेक पादचारी या रस्त्यावरून गेले़ मात्र, यापैकी बहुतांश नागरिकांसह रिक्षाचालक आणि दुचाकीचालकांनी उताऱ्यास बगल देत दुसऱ्या बाजूने जाण्यास प्राधान्य दिले़ यावरून शहरातील नागरिकांच्या मनात आजही अंधश्रद्धेची प्रचंड भीती निर्माण असल्याचे आढळून आले़ विविध कायदे, समाजप्रबोधन करूनही नागरिकांची अंधश्रद्धेची मानसिकता बदलत नाही़ शासनाचा अंधश्रद्धेविरोधात कायदा असतानाही त्या कायद्याची पायमल्ली होत आहे़ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आजही सुशिक्षित लोकांकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे आढळून आले़ पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या बुरसटलेल्या रूढी कायम ठेवण्याचा अट्टहास काही नागरिकांकडून केला जातो़ त्यांच्यामुळे अनेकांना अंधश्रद्धेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागत आहे़ शहरीकरण वाढले असले तरी अंधश्रद्धा कायमच असल्याचे पाहणीत दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यावर उतारा ठेवण्यात आला. तो उतारा चुकविण्याचा प्रयत्न रस्त्याने ये जा करणारे नागरीक करीत होते. उतारा ओलांडण्याची भीतीजागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिनी लोकमतने पिंपरीतील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक ते इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलादरम्यान उतारा ठेवला. दुपारी चारची वेळ... रस्त्यावर वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची रहदारी होती. अनेकजण रस्त्यातील लिंबू, मिरची, हळद, कुंकू ठेवलेला उतारा पाहून वाट बदलत होते. उताऱ्याचे दृश्य बघून त्यांच्या मनात भीती निर्माण होत होती. वाहनांचे वेग मंदावले; पादचारी थबकलेअवघ्या अर्ध्या तासात अनेक पादचाऱ्यांनी लिंबू, मिरच्या, हळद-कुंकू असलेला उतारा ओलांडून न जाता दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा मार्ग स्वीकारला़ यात प्रामुख्याने महिला आणि नागरिकांचा समावेश होता़ रस्त्यावरून सरळ आल्यानंतर अचानक रस्त्याच्या मध्ये असलेला उतारा पाहून महिलांनी एकमेकांना खुणावत, हाताला धरून उताऱ्याला न ओलांडण्याचा मूक सल्ला एकमेकींना दिला़ वाहनचालकांनी उताऱ्याला पाहताच वाहनाचा वेग कमी करून उताऱ्यास वळसा घालून जाणे पसंत केले़दुकानदार धास्तावलेलोकमत प्रतिनिधी स्टिंग आॅपरेशनची तयारी करीत असताना एका दुकानासमोर उभे राहून लिंबू, हळद, कुंकू, मिरच्या एकत्रित करून रस्त्यावर ठेवण्याच्या तयारीत होते़ हे पाहून एक दुकानदार घाबरत बाहेर आला आणि प्रतिनिधीस म्हणाला, ‘‘अहो भाऊ, हे काय करताय? माझ्या दुकानासमोर हे असलं काही ठेवू नका़’’ यावरून अशा वस्तूंची कोणत्याही ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात जमवाजमव करीत असताना शेजाऱ्यांना प्रचंड भीती निर्माण होत असल्याचे चित्र आढळून आले़ बहुतांश मोटारगाड्या आणि दुचाकींच्या दर्शनी भागावर एका तारेत काळी कापडी बाहुली, मिरच्या, बिबवा अडकविल्याचे दिसून आले़ सुशिक्षित तरुणांच्या वाहनांवर लटकविलेल्या काळ्या बाहुलीचे प्रमाण लक्षणीय होते़