ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - 'दररोज योगासने करणा-या विद्यार्थ्यांना जादा गुण दिले जातील' अशी घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक व शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त रहावे, योगाभ्यासाला चालना मिळावी यासाठीच ही घोषणा करण्यात आल्याचे समजते. बुधवारी योगगुरू बाबा रामदेव यांच्या योगविषयक कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर विनोद तावडे यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली.
' विद्यार्थ्यांनी योगाचा फायदा करून घ्यावा. विविध क्रीडा प्रकारात भाग घेणा-या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर रोज योगासने करणा-या विद्यार्थ्यांनाही जादा गुण दिले जातील' असे ट्विट तावडे यांनी केले. दरम्यान 'योगा कॅम्प' संदर्भात सर्व शाळांना सर्क्युलरही पाठवण्यात आले आहे, मात्र त्यास उपस्थित राहण्याचे बंधन कोणावरही लादण्यात आलेले नाही. असे असले तरी सर्व शाळांनी याचा भरपूपर फायदा करून घ्यावा, असेही शिक्षण विभागातर्फे सुचवण्यात आले आहे.
या नव्या घोषणेमुळे शिक्षकवर्ग मात्र फारसा खुश दिसत नाहीत. ' योगासने करण्याचे विविध फायदे असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी जास्तीच्या गुणांचे आमिष दाखवल्यानंतर त्याचा विद्यार्थ्यांकडून दुरूपयोग होऊ शकतो. यापूर्वी स्पोर्ट्स कोट्यासंदर्भातही असे प्रकार घडले असून जास्तीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांनी काही वेळा बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याच्या घटना घडले आहेत' अशा शब्दात एका मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षिकेने याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.
Urged students to benefit from Yoga, Students practicing Yoga everyday will be awarded extra marks like of Sports. pic.twitter.com/LiMgZTmPAC— Vinod Tawde (@TawdeVinod) January 20, 2016