ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - योगाचा विज्ञानिक आधारावर प्रसार करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. पाकिस्तान व चीन यासह जगभरातील लोक योगाकडे आकर्षित होत आहे. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग सर्वात चांगला उपाय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून महापालिकेतर्फे यशवंत स्टेडियम येथे आयोजित योग शिबिरात गडकरी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी व नागरिकांचा समावेश असलेल्या हजारो लोकांच्या समुदायासोबत त्यांनी स्वत: ४५ मिनिटे योगासने केली. यावेळी उपस्थितांना त्यांनी स्वच्छतेची शपथ दिली. महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे यांनीही यात सहभाग घेतला. आज जगभरात योगाला मानसन्मान मिळाला आहे. या कार्यक्रमातील नागरिकांचा सहभाग ऐतिहासिक आहे. योग दिनाचा वर्षातून एकदाच कार्यक्रम न करता महापालिकेने आपल्या बगिचात योग साधनेसाठी साधने उपलब्ध करावी. योग संस्थांनीही याचा प्रचार करावा. असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.