अमोल ठाकरे / संग्रामपूर (जि. बुलडाणा) देशभर द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी हातामध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्या घेऊन योगासन करुन अनोखे सांकेतिक योग आंदोलन केले. अस्तित्व महिला संघटनेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून बुलडाणा जिल्हय़ात दारूबंदीची मागणी केली जात आहे. यासाठी जिल्हा पातळीसह नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान आंदोलनही करण्यात आले; मात्र तरीदेखील या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. मंगळवारी सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अस्तित्व संघटनेतर्फे दारू विक्रीचा निषेध करण्यात आला. दारूबंदीच्या मागणीसाठी हातात दारूच्या बाटल्या घेऊन महिलांनी योगाचे धडे गिरविले. संपूर्ण दारूबंदी होत नाही तोपर्यंत जागतिक योग दिवस साजरा करण्यात काहीही अर्थ नाही, अशा घोषणाही महिलांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून तरुण पिढी बरबाद होत असताना, योग दिन साजरा करणे दुट्टपीपणाचे लक्षण असल्याचा आरोपही यावेळी महिलांनी केला. संपूर्ण महाराष्ट्र राज्य नाही तर भारतामध्ये दारूबंदी घोषित करा या मागणीसाठी सांकेतिक योग आंदोलन च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली.
योग दिनी महिलांचा असाही ‘योग’!
By admin | Published: June 21, 2016 11:42 PM