सावरकर वादावरून सोमणांची राहुल गांधींवर घणाघाती टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 03:26 PM2019-12-15T15:26:52+5:302019-12-15T19:05:15+5:30
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे.
नवी दिल्लीः राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे. राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे सावरकर प्रेमी प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करण्यात सुरुवात केली आहे. प्रसिद्ध रंगकर्मी आणि सावरकरांचे प्रेमी असलेल्या योगेश सोमण यांनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत. एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून सोमण यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोमण यांनी राहुल गांधींची 'खान' अशी हेटळणी केली आहे.
तू सावरकर नाही, त्यांच्यातले तुझ्यात काहीही गुण नाहीत, पण मला तर वाटतं तू गांधीसुद्धा नाहीस, कारण गांधीजींमधलेही गुण तुझ्यात नाहीत. लग्नानंतर भारतीयांना स्वीकारार्ह व्हावं म्हणून तुझ्या इंदिरा आज्जी आणि फिरोज आबांना गांधीजींनी हे आडनाव दिलं. सध्याची तुझी अवस्था ही आधी मर्कट त्यातही मद्य प्राशन केलेला, अशी झाली आहे. तरीसुद्धा तुझ्या पप्पूगिरीचा मी निषेध करतो. सावरकरांचं आडनाव घेण्याचीही तुझी औकात नसल्याचंही ते म्हणाले आहेत.माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. रेप इन इंडिया या विधानावरुन राहुल यांनी माफी मागावी, अशी भूमिका भाजपानं घेतली. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन ट्विट करून राहुल गांधींना सूचक इशारा दिला. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,' असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना यांच्यातील हे शीतयुद्ध नवाब मलिक यांनी शायरीतून व्यक्त केलं आहे.