घराणेशाहीविरोधात नेहमीच बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोचरी टीका केली. नरेंद्र मोदी आमच्यावर घराणेशाहीवरून आरोप करतात. मात्र तुमच्या तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
आम्ही इंडिया आघाडीची बैठक घेतली होती तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले की, ही विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही विरोधी आहोत, जरूर आहोत. पण आम्ही विरुद्ध आहोत ते हुकूमशाहाच्या विरोधात आहोत. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात आहोत. जेव्हा नरेंद्र मोदी तुम्ही आमच्या घराणेशाहीवर आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाश आंबेडकर यांच्या भाषेत बोलणार नाही. पण तुमच्या परिवारामध्ये तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमच्या परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ही जी काही आपण आपली लढाई लढतोय, ती लोकशाही वाचवण्याची आहे. संविधान वाचवण्यासाठीची लढाई आहे. ज्या संविधानाबाबत शिवसेनाप्रमुख सांगायचे की, याची सुरुवात ही कोर्टापासून केली पाहिजे. कोर्टामध्ये कुठल्याही धर्मग्रंथाऐवजी घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला सुरुवात पाहिजे. पण आज भाजपाला घटना बदलायची आहे. यांना ४०० पार जागा त्याचसाठी पाहिजे आहेत. यांचे एक नेते अनंत कुमार हेगडे तसं म्हणाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
तसेच एका पक्षाला बहुमत मिळून सत्तेवर आलेलं सरकार चांगलं नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, असं काही वेळा वाटायचं की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे. पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलं की, आपलं युतीचं सरकार होतं, अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. सगळेच त्यामध्ये होते. एनडीएमध्ये छान वातावरण होतं. ममता, समता, जयललिता आपण सगळे एकत्र होतो. अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं. त्यावेळी देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फिल गुड अशी होती. मग मनमोहन सिंग यांनी चांगल्याप्रकारे सरकार चालवलं होतं. आता २०१४ पासून एका पक्षाचं सरकार आहे. २०१४ नंतर २०१९ आता २०१९ नंतर २०२४. आता म्हणताहेत की विरोधी पक्ष २०२९ मध्ये अडकलाय. मात्र मी २०४७ चा विचार करतोय. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशातील जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठा असला तरी ज्यावेळी सगळे लोक एकवटतात, तेव्हा हुकूमशाहाचा अंत होतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.