"तुम्ही स्थानिक भुरट्या चोरांविरोधात लढताय, मी तर डाकूशी लढतोय", नाना पटोलेंचा भाजपावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 08:02 PM2021-09-29T20:02:22+5:302021-09-29T20:03:20+5:30
Nana Patole : पालघर येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पालघर येथे आले होते
पालघर : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे. मात्र, भाजपाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे. देशाची संवैधानिक व्यवस्था संपविणाऱ्या भाजपा राक्षसाला मतदानाच्या माध्यमातून संपवून टाकण्याचे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
पालघर येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पालघर येथे आले होते. यावेळी आपल्या विरोधात निवडणुकीत पैशांचा वापर केला जाईल. निवडणुका पैशांनी जिंकता येतात हा समज बदलण्याचे काम केले पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून कामगार शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा म्हणजे पैशांची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तुम्ही निवडणुकीत स्थानिक भुरट्या चोरांविरोधात लढताय, मी तर डाकूशी लढतोय असेही नाना पटोले म्हणाले. याशिवाय, कोरोना हा मानवनिर्मित आजार भाजपाने देशात आणल्याचेही त्यांनी सांगितले.
याचबरोबर, भाजपाने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस 900 रुपये झाला, एवढा महाग गॅस गरिबांना परवडत नाही. त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तु बनून राहिली आहे. यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपाचा डाव आहे. सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी रहिलेली आहे व यापुढेही उभी राहिल, अशी ग्वाही यावेळी नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, प्रदेश सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रफीक भुरे किसान काँग्रेसचे पराग पाष्टे, पालघरचे सहप्रभारी संतोष केणे आदी उपस्थित होते.