मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 08:12 AM2024-12-10T08:12:31+5:302024-12-10T08:12:57+5:30
विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताच सभागृहात बाके वाजवून जोरदार स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विरोधी पक्षाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली. दरम्यान, उद्धवसेनेच्या आमदारांनी या निवडीवर बहिष्कार टाकला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्ष निवडीचा मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी घोषित करताच विधानसभेत ‘जय भवानी, जय शिवाजी...’ अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांनी सभागृह दणाणून सोडले.
Ūīविधानसभेचे कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रस्ताव मांडला. अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील, भाजपचे आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतास टाकला असता आवाजी मतदानाने सभागृहाने एकमताने मंजूर केला. प्रस्ताव मंजूर होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी करताच सभागृहातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांनी बाके वाजवून निवडीचे स्वागत केले.
कोळंबकर यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, नितीन राऊत, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नार्वेकर यांना अध्यक्षस्थानी आसनस्थ करत त्यांना शुभेच्छा दिल्या. हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
त्यांची अनुपस्थिती अस्वस्थ करणारी
मुंबई : “तुम पर कोई जबरदस्ती नही
की तुम मेरी सारी बाते मानो...
मुझे सिर्फ इतना पता है की,
मेरे लिए तुम बहुत जरुरी हो
हा शेर ऐकवत विधानसभाध्यक्षपदी पुन्हा निवड झालेले ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना भावनिक आवाहन केले. सभागृहाच्या कामकाजात मला दोन्ही बाजूंचे सहकार्य आवश्यक आणि तितकेच मोलाचे आहे. १५ व्या विधानसभेच्या आरंभदिनी विरोधी बाकांवरील अनुपस्थिती मला अस्वस्थ करून गेली. असे चित्र यापुढे दिसायला नको, असे म्हणत त्यांनी हा शेर ऐकविला.
दोन्ही बाजूंचे आभार मानून त्यांनी विधानसभेत आपण दोन्ही बाजूंना न्याय देऊ असे आश्वासन दिले. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे जनतेच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता व्हवी यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.