"नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार", काँग्रेसचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 06:19 PM2023-05-26T18:19:08+5:302023-05-26T18:19:49+5:30

Congress Criticize BJP: पंडित नेहरू यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव बदलून IDBI प्रशिक्षण महाविद्यालय करण्यात आले आहे

"You can delete Jawaharlal Nehru's name, but how will you delete him from the minds of crores of people", Congress asked BJP | "नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार", काँग्रेसचा भाजपाला सवाल

"नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार", काँग्रेसचा भाजपाला सवाल

googlenewsNext

मुंबई - भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल अत्यंत घृणा आहे. नेहरु नावाची ऍलर्जीच त्यांना जडलेली आहे म्हणून नेहरुंची सातत्याने बदनामी केली जात आहे. पंडित नेहरू यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव बदलून IDBI प्रशिक्षण महाविद्यालय करण्यात आले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरु यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील योगदान व स्वातंत्र्यानंतर देशाला ताठ मानेने एक समृद्ध राष्ट्र म्हणून जगात उभे करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या देश तोडणाऱ्या विचारधारेला पंडित नेहरुंच्या आधुनिक विचाराने मोठी चपराक दिली आहे. नेहरु हे या दोन्ही संस्थांच्या निशाण्यावरच असतात म्हणूनच नेहरुंचे योगदान नाकारण्यासाठी बदनामी मोहिम राबवली जात आहे.भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही प्रयत्न केला तरी या देशाच्या प्रत्येक भव्य दिव्य व देशाच्या विकासात मैलाचे दगड ठरलेल्या संस्था आजही दिमाखदारपणे उभ्या आहेत. एखाद्या संस्थेचे नेहरु नाव बदलल्याने पंडित नेहरुंचे महत्व कमी होत नाही.

भाजपा सरकारने कोणतेही नावलौकिक मिळवणारे काम केले नाही. त्यांच्याकडे नाव घ्यावे असा एकही महापुरुष नाही म्हणूनच पंडित नेहरुंसारख्या जागतिक किर्तीच्या नेत्याचे महत्व कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. केवळ नाम बदलणे हेच काम भाजपा सरकार करत असते. अशा कोत्या मनोवृत्तीने नेहरुंचे नाव पुसले जाणार नाही तर ते आणखी गडद होत जाईल, असे लोंढे म्हणाले.

Web Title: "You can delete Jawaharlal Nehru's name, but how will you delete him from the minds of crores of people", Congress asked BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.