पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन टांगाचे सरकार आहे. पण माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत माझे संबंध कसे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाचे निमंत्रण मला अद्याप मिळालेले नाही. याचाच अर्थ यात कोणी काटा घातला असेल हे तुम्ही चांगल्याप्रकारे समजू शकता, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना जोरदार टोला लगावला आहे.
मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार आहे. मात्र, या पायाभरणी कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून त्यावरून राजकीय वर्तुळात चांगलेच मानापमान नाट्य सुरु झाले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक पायाभरणी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, स्मारक पुतळा पायाभरणी कार्यक्रमाचे अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. मात्र कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी अटलबिहारी वाजपेयींची इंदू मिलच्या जागेबाबत जी नोट आहे तिचे प्रथम अध्ययन करावे. तसेच वाजपेयींना नेमके काय अपेक्षित होतं ते ठाकरेंनी बघावे आणि त्यासाठी पुढाकार घ्यावा.
स्मारकाच्या आराखड्याबाबत सुरूवातीपासूनच माझा आक्षेप आहे. तरीही मला कोणावर ही आरोप करायचे नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला अशा कार्यक्रमांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन बोलेल असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.