Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माहिम मतदारसंघात मुलगा अमित ठाकरेसाठी जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, शिवसेनेच्या स्थापनेपासून ते मनसेच्या स्थापनेपर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी त्यांनी अमित ठाकरेंसहमनसेच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले.
अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात कसे उतरले?अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना राज म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे किंवा माझ्या वडिलांनी कोणती गोष्ट करा अथवा करू नका, असं मला कोणीच सांगितले नाही. त्यामुळे मीही माझ्या मुलाला काही सांगत नाही. त्याला निवडणूक लढवावी वाटली, तो लढवतोय. पण निवडणुकीत उतरावे असे मला कधीच वाटत नाही. कारण, मी ज्या मुशीतून वर आलोय, त्यामुळे मला असे काही वाटत नाही.'
'अमितला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, याबाबत मला फारशी कल्पना नव्हती. पण, मीडियातून सातत्याने याबाबत बातम्या येत होत्या. एके दिवशी नेत्यांची आणि सरचिटणीसची बैठक झाली, तेव्हा अमित बोलला की, सर्व नेत्यांनी उभं राहील पाहिजे, मी पण उभा राहीन. आम्ही पण बैठक घेतली, त्यात त्याला विचारलं उभा राहणार आहेस? तो बोलला तुम्ही सांगाल तर राहीन.'
उद्धव ठाकरेंवर निशाणा
'तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी उद्धव आजारी पडला, त्यावेळी मी पहिल्यांदा गाडी घेऊन गेलो. मी कुटुंबाच्या आड कधी राजकारण आणत नाही. गेल्यावेळी आदित्य उभा होता, तेव्हा मी मनाने उमेदवार नाही दिला. तिथे मनसेची 38 हजार मते आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा मनात पण नव्हते अमित निवडणुकीला उभा राहणार. माझ्या काय त्याच्याही मनात नसेल. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार', असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवला.
त्यांची सगळी अंडी पिल्ली...
'मी आज तुम्हाला सांगतो, ह्याचे नाव जरी अमित राज ठाकरे असले, तरी याला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही. आज मी इथे आलोय, तुमची अपेक्षा असेल की, समोरच्या उमेदवारबद्दल बोलवं. अमितच्या विरोधात जी माणसं उभी आहेत त्यांची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढू शकतो. मात्र त्या घाणीत मला हात नाही घालायचा. ह्यांच्याबद्दल काय बोलावं? बाळासाहेबांना सोडून काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा शिवसेनेत आले अन् आता एकनाथ शिंदेंकडे गेले. दुसरे उमेदवारही काँग्रेसमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेत आले, त्यांच्याबद्दल फार बोलण्याची गरज नाही.'
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
'तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. मी आमच्या प्रत्येक उमेदवाराला सांगितले आहे की, तुमचा नंबर प्रत्येक नागरिकाला द्या आणि त्यांच्या समस्य्या ऐकून घ्या. आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. आज अमितसाठी माझी ही एकच सभा आहे. प्रत्येकासाठी मी सभा घेतोय. अमितला, संदीपला आणि महाराष्ट्रमध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे तिथे तिथे त्यांना निवडून द्या,' असे आवाहनदेखील राज ठाकरे यांनी यावेळी केले.