पुणे - पैलवानाला गदा दिली जाते, पण आज पहिल्यांदाच कधीही कुस्तीचा लंगोट न घातलेल्या अजित पवारांना तुम्ही गदा दिली. तलवार आम्हाला नेहमी दिली जाते पण तुम्ही दिलेली गदा मलाही कळालं नाही कुठं ठेवावी, कशी धरावी अशाप्रकारे अजितदादांनी पुण्यातील एका कार्यक्रमात भाष्य केल्याने जनमाणसात हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कात्रजच्या आंबेगाव खुर्दमधल्या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उप महाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि पोलीस उपअधिक्षक कुस्तीगीर राहुल आवारे यांचा सन्मान केला. यावेळी उपस्थित आयोजकांनी अजित पवारांचा सन्मान करताना त्यांच्या हातात गदा दिली त्यावेळी ते बोलत होते.
याबाबत बोलताना अजितदादा म्हणाले की, गदा ही पैलवानांच्या खांद्यावर शोभून दिसते. दुसऱ्या कोणाच्या खांद्यावर शोभून दिसत नाही. राज्यातील खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी काय काय करता येईल यासाठी क्रिडामंत्र्यांसोबत बैठक घेतली. मुलगा अभ्यासात कमकुवत असला तरी खेळात उत्कृष्ट हवा असं पालकांना वाटलं पाहिजे. एखाद्या खेळात यश संपादन केल्यानंतर त्याला चांगली नोकरी लावता येईल यासाठी महाविकास आघाडीचं सरकार प्रयत्नशील असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचसोबत आजपर्यंत पवार कुटुंब फक्त राजकीय मैदान गाजवतात असा माझा समज होता पण पवार कुटुंब कुस्तीचं मैदानही गाजवतात हे आज कळालं. त्यामुळे पवार इथंही कमी नाही हे पुणेकरांनी लक्षातं घ्यावं असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला. तसेच आज पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे, सत्कार समारंभामुळे गर्दी झाली. पण नागरिक बोलणार कोणाला पैलवानांचा कार्यक्रम आहे असा चिमटा अजित पवारांनी काढला.