मुंबई- शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. शिंदे गटाकडून, तेच बाळासाहेबांची खरे वारसदार असल्याचा दावा केला जातोय, तर ठाकरे गट त्यांना सतत गद्दर म्हणत आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून आता याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
'तुम्हाला अधिकार नाही'शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. 'मुख्यमंत्री परदेशात गेले की, इतरांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येते. उद्धव ठाकरे आजारी असताना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे का दिला नाही. विश्वास ठेवला असता तर तुम्ही विश्वासघात केला असं म्हणू शकता. अन्यथा तुम्हाला विश्वासघातकी म्हणण्याचा अधिकार नाही,' अशी टीका केसरकर यांनी केली.
'आम्ही परत यायला तयार होतो...'
ते पुढे म्हणाले की, 'ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वेचलं, त्याला तुम्ही मुख्यमंत्रीपद देऊ असं म्हणतात. पण, त्यांनी नम्रपणे नकार दिला. आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची साथ सोडा, असं वारंवार सांगितलं होतं. पण तुम्ही ऐकलं नाही. आम्ही गुवाहाटीवरून परत येण्यास तयार होतो, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही,' असा हल्लाबोल केसरकरांनी केला.