महाराष्ट्रात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडण्यात यशस्वी झालेले, नागपुरात महाराष्ट्राचे महाचाणक्य अशी बॅनरबाजी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एएनआय या वृत्तसंस्थेला सगळ्या घडामोडींचा उलगडा करणारी मुलाखत दिली आहे. याचा टीझर रिलीज झाला असून त्यामध्ये फड़णवीस २०१९ च्या ठाकरे आणि शरद पवारांच्या भूमिकांवर बोलले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत स्मिता प्रकाश यांनी घेतली असून सायंकाळी ५ वाजता ती लाईव्ह करण्यात येणार आहे. सुमारे दीड मिनिटांचा हा टीझर आहे. २०१९ मध्ये कोणी कोणाला धोका दिला, या प्रश्नावर फडणवीस यांनी धोका उद्धव ठाकरेंनीच दिल्याचे म्हटले आहे. ही मुलाखत २९ जून रोजी घेण्यात आली होती.
बहुमत आल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आले की संख्याबळ असे आहे की आमच्यापासून दूर जात दुसऱ्या दोन पक्षांसोबत गेल्यावर सरकार बनू शकते. तेव्हा त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली. स्पष्ट बहुमत मिळालेय तरी १० दिवस ते आम्हाला टाळत होते. तेव्हाच आमच्या लक्षात आले की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनण्याचे ठरविले आहे, असे फडणवीस म्हणाले.
तेव्हाच राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधला. आपण एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. यामुळे आम्ही शरद पवार यांच्यासोबत बैठक केली. महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देण्याचे शरद पवारांनी मान्य केले. भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येतील. परंतू, एका सकाळी शरद पवार मागे हटले. तेव्हा अजित पवारांनी म्हटले की एवढे पुढे गेल्यावर मी तरी मागे येऊ शकत नाही, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
विरोधकांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु होती, शरद पवार तेव्हा गॉड फादरच्या रोलमध्ये होते. परंतू, स्वास्थ्याच्या कारणामुळे ते आता थोडे मागे हटले आहेत, मग यात राष्ट्रवादीचा काय हेतू आहे, असा सवाल स्मिता प्रकाश यांनी केला आहे. यावर फडणवीस यांनी तुम्ही अजून शरद पवारांना ओळखलेले नाहीय, विरोधकांना एकत्र आणण्यामागे शरद पवारच आहेत. एकमेकांची तोंडं देखील जे पक्ष पाहत नाही त्यांना समोरासमोर बसविण्याची हिंमत पवारांमध्ये आहेत. त्यांना स्वास्थ्याची समस्या आहे, परंतू ते फिट आहेत. रायकीय दृष्ट्या ते सर्वात अलर्ट आहेत, अशी स्तुती फडणवीस यांनी केली आहे.