मुंबई : माहिती अधिकाराचा वापर करून स्वत:च्या राहत्या विभागातील नगरसेवकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्याची पद्धत मराठी अभ्यास केंद्राने समोर आणली आहे. या उपक्रमातून भाषेचे काम विकासाशी जोडून त्यातून नव्या मराठीकरणाची लोकचळवळ उभारण्याचा मानस मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केला आहे. पवार म्हणाले की, मराठी अभ्यास केंद्राची ही राजकीय भूमिका आहे. प्रभाग क्रमांक १९०मधील नगरसेवकाचे मूल्यांकन करत अभ्यास केंद्राने एक नमुना अहवाल तयार केला आहे. या माध्यमातून महापालिका कामकाजात मराठीचा वापर वाढवण्याच्या काही उपाययोजना सुचविल्या आहेत. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि महापौर यांना दिल्याचेही अभ्यास केंद्राने स्पष्ट केले. अहवालाचे लेखक आनंद भंडारे यांनी सांगितले की, पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्राने वरळी बीडीडी येथील प्रभाग क्रमांक १९० या परिसरातील नगरसेवकाच्या कार्याचे मूल्यमापन केले आहे. माहिती अधिकारातून काही प्रश्न उपस्थित करून महापालिका मुख्यालय आणि स्थानिक वॉर्ड कार्यालयातून ही माहिती गोळा करण्यात आली. त्यासाठी चार महिने खर्ची घालावे लागले. मात्र त्यातून तयार केलेल्या पद्धतीतून अवघ्या एक ते दीड महिन्यात केवळ सात प्रश्न उपस्थित करून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या-त्यांच्या नगरसेवकांचे मूल्यांकन करता येईल. यासाठी फक्त १ हजार १५० रुपये खर्च आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>महापालिकेने माहिती उघड करावी महापालिकेने प्रभागासाठी किती निधी दिला, त्यातील किती खर्च झाला याचा सर्व लेखाजोखा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. शिवाय कामाच्या ठिकाणाचा नेमका पत्ता सहज सापडेल अशा प्रकारे खरेदी आदेशात नोंदवावा आणि तो आदेश मराठीतून असावा, असे आवाहनही अभ्यास केंद्राने केले आहे.मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेल्या मूल्यांकन पद्धतीविषयी नगरसेवकाने उपलब्ध निधी कुठे, किती आणि कोणत्या कामांसाठी वापरला? कोणत्या कामांना नगरसेवकाने प्राधान्य दिले? महापालिकेच्या विशेष गट समित्यांमध्ये नगरसेवक आहे का? असल्यास गट समिती आणि प्रभाग समित्यांच्या बैठक आणि सभांमध्ये संबंधित नगरसेवकाची उपस्थिती किती आहे? च्या सभांमध्ये नगरसेवकाने कोणते प्रश्न उपस्थित केले?महापालिका, नगरसेवक हे करणार का?प्रत्येक नगरसेवक आणि विभाग अधिकाऱ्याला क्षेत्र सभा बंधनकारक करावी.विशेष समित्यांवर सदस्य निवडताना त्यांची गुणवत्ता, विशेष प्रावीण्य तपासले जावे.प्रत्येक नगरसेवकाने समिती आणि सभा बैठकांना लावलेल्या हजेरीची नोंद कार्यालयाबाहेर ठळकपणे लावावी.नगसेवकाने मांडलेले ठराव व प्रस्तावाची बैठकनिहाय नोंद कार्यालयाबाहेर लावावी.>तज्ज्ञ काय म्हणतात मराठी अभ्यास केंद्राने नगरसेवकांच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी अतिशय लक्षणीय संशोधन पद्धती वापरली आहे. केवळ वाईट गोष्टींसाठी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरू नये. या पद्धतीचा वापर करून लोकप्रतिनिधींनी केलेले काम समजून घ्यायला हवे. जेणेकरून राजकीय वर्गाला सतत दोष देण्याऐवजी सर्वसामान्यांना त्यांच्या कामावर देखरेख ठेवून शासन व प्रशासन व्यवस्थेत सामील होता येईल.- शैलेश गांधी, माजी केंद्रीय माहिती आयुक्तमाहिती अधिकार हे सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता आणि गैरकारभारावरील अंकुश यासाठी नागरिकांना मिळालेले एक अत्यंत प्रभावी साधन आहे. त्याच्या गैरवापराबद्दल नाकारता येत नाही. मात्र सार्वजनिक हितासाठी या कायद्याचा उपयोग कशा प्रकारे होईल, याचे उत्तम उदाहरण मराठी अभ्यास केंद्राने दिले आहे. नागरिकांनी त्याचा विचार करून आपापल्या क्षेत्रातच असा धांडोळा घेण्याला प्रवृत्त व्हावे.- विजय कुवळेकर, माजी राज्य माहिती आयुक्त
तुम्हीच करा तुमच्या नगरसेवकांचे मूल्यांकन!
By admin | Published: September 19, 2016 1:41 AM