मुंबई : ‘आपले’ मतदार सकाळी ११ पर्यंत मतदान पूर्ण करतील या दृष्टीने प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी यंत्रणा सक्रिय करा, असे आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील ३६ संघटनांच्या बैठकांमधून देण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका झाल्या. नंतर तालुकास्तरीय बैठका झाल्या.
जिल्हा बैठकांना रा. स्व. संघाचे त्या-त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक उपस्थित होते. परिवारातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि भाजपचे निवडक नेतेही बैठकांना हजर होते. आपला परंपरागत मतदार प्रत्येक बुथवर असतो. त्याचे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे आणि शक्यतो सकाळी ११ पर्यंत ते आटोपले पाहिजे, अशा सूचना या बैठकांमध्ये देण्यात आल्या.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही परिवारातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते परस्पर समन्वय राखणार आहेत. केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय विचारांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचे निर्देश या बैठकांमध्ये देण्यात आले. आपल्याला कोणाचेही व्यक्तिमाहात्म्य सांगायचे नाही.
- मोदी सरकारने दहा वर्षांत अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. पुढेही असेच काही विषय मार्गी लावायचे तर आपल्या विचारांचे सरकार येणे आवश्यक आहे, असे बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आले.
गावागावातील मंदिरांमध्ये बैठका राष्ट्रहित समोर ठेवून गेल्या दहा वर्षांत अनेक निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतले असल्याचे निदर्शनास आणून देत राष्ट्रीय मुद्द्यांचा अजेंडा राबवायचा असेल तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी द्या, असा संदेश देणाऱ्या हजारो बैठका संघ आणि परिवारातील ३६ संघटनांचे पदाधिकारी आगामी १५ ते २० दिवसांत राज्यभर घेणार आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे शक्यतो गावागावातील मंदिरांमध्ये या बैठका होतील. प्रत्येक बैठकीला दहा ते बारा जणांनाच आमंत्रित केले जाईल. विविध क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या व्यक्तींचा आमंत्रितांमध्ये प्रामुख्याने समावेश असेल. संघाच्या रचनेत एका जिल्ह्यात ६० ते ७० मंडळ असतात. एकेका मंडळात किमान ६०० ते ७०० बैठका होतील.