एकनाथ पाटील - कोल्हापूर १९९८ पासून ‘सनातन’ विचारांच्या प्रभावाखाली आलेल्या समीर गायकवाड याची जन्मकुंडली कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या कुंडलीमध्ये मुंबईतील एका ज्योतिषाने ‘तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील,’ असे भाकित व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची माहिती एकत्रित करणे, ती संघटनेला पुरविणे येथून त्याची सुरुवात झाल्याचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असला तरी पानसरे हत्येमध्ये त्याचा अतिजवळचा सहभाग असल्याचे पोलिसांचे ठाम मत आहे. पानसरे यांच्या हत्येच्या तपासामध्ये पोलिसांची २० पथके सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक व आर्थिक व्यवहार, आदी विषयांवर रात्रं-दिवस काम करत होती. त्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तपास यंत्रणेचा अवलंब केला होता. नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते, सराईत गुन्हेगार, आदींकडे वारंवार विचारपूस केली जात होती. प्रसंगी महाराष्ट्र-कर्नाटकातील सराईत गुन्हेगारांना ‘खाकीचा प्रसाद’ही खावा लागला. आतापर्यंत पोलिसांनी दोन कोटी मोबाईल कॉल डिटेल्सचीही तपासणी केली. महाराष्ट्र-कर्नाटकात काही पथके तळ ठोकून होती. या संपूर्ण तपासामध्ये सुरुवातीपासून पोलिसांचा ‘सनातन’चा कार्यकर्ता समीर गायकवाड याच्यावर संशय होता.यापूर्वीही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. त्यामुळे त्याला पोलीस मागावर असल्याची चाहूल लागली नव्हती. यावेळी पोलिसांच्या हाती रॅम्बो चाकू, ‘सनातन’ धर्माची २० पुस्तके, कॅप, भित्तीपत्रके, हिशेबाच्या पावत्या, लग्नपत्रिका, बँकेचे पासबुक, आदी साहित्य मिळून आले. त्यामध्ये पोलिसांना त्याची ‘जन्मकुंडली’ मिळाली. त्यामध्ये ज्योतिषाने ‘तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील’ असे लिहिल्याचे निदर्शनास आले. ज्योतिषाने लिहिलेल्या जन्मकुंडलीचे भविष्य पानसरे हत्येच्या घटनेने तंतोतंत खरे ठरत आहे. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्याची वैयक्तिक डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. ती चाळली असता त्यामध्ये धर्माचे काम कसे चालते, याची माहिती लिहिली आहे. गायकवाड याचा संपूर्ण परिवार सनातन विचारांचा असल्याने तो कट्टर साधक असल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे.
‘तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील’
By admin | Published: September 18, 2015 12:52 AM