मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील निमखेडी शिवारात तीन अस्वलांनी हल्ला चढविल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी शेतातील कुत्री व परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने तरुणाची सुटका झाली. शिवारात अस्वल असल्याची वार्ता पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील निमखेडी येथील कांतीलाल राठोड यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा सचिन (१८) याच्यासह राजू सुखलाल राठोड व काही मजूर कांद्याच्या पिकाला पाणी देणे व फवारणीचे काम करीत होते. दरम्यान, पाटाने पाणी कमी येत असल्याने सचिन हा पाहण्यासाठी गेला असता, त्याला मादी अस्वलासह तिची दोन पिल्ले शेतातच बसलेले दिसले. त्या तीन अस्वलांना पाहताच घाबरून सचिन पळाला; मात्र तोल जाऊन पडला. पाठोपाठ अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला. सचिनच्या पायाचा अस्वलाने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. शेतात फवारणीचे काम करीत असलेले राजू राठोडसह परिसरातील मजुरांनी धाव घेऊन सचिनला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु एका अस्वलाचा हल्ला परतवत असताना दुसरे अस्वल हल्ला करीत असल्याने परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान बाजूच्या शेतातील कुत्री धावून आल्याने अस्वलाने पलायन केले व सचिनची सुटका झाली. दरम्यान, वन विभागाच्या जलद कृती दलाचे पथक निमखेडी शिवारात रवाना झाले. दोन पिलांसमवेत असलेल्या अस्वलीला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात येईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
तीन अस्वलांच्या हल्ल्यात तरुण गंभीर
By admin | Published: March 12, 2016 2:34 AM