काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून आत्महत्या करणा महिलेला कॅब चालक आणि पोलिसांनी वाचविल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधलेला अटल सेतू आता आयुष्य संपविणाऱ्यांचा स्पॉट बनू लागला आहे. पुण्याच्या एका बँकरने अटल सेतूवरून समुद्राच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे समजताच पोलीस तिथे पोहोचले. परंतू, तोवर बँकर ॲलेक्स रेगी याचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीमध्ये कार थांबल्याचे पाहून यंत्रणेने पोलिसांना याची सूचना दिली होती. परंतू, पोलीस पोहोचेपर्यंत अॅलेक्सने समुद्रात उडी मारली होती.
अॅलेक्स हा पिंपरीत राहणारा असून कंपनीच्या मिटींसाठी तो मुंबईला गेला होता. मुंबईत राहणाऱ्या सासऱ्याचीही त्याने भेट घेतली होती. तेथून पुण्याला परतत असताना त्याने अटल सेतूवरून उडी मारली आणि आयुष्य संपविले. अवघ्या ३५ वर्षीय बँकरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
कामाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्याने सुसाईड नोट मागे सोडलेली नाही. बचाव पथकाने त्याचा मृतदेह शोधला आणि कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. रेगी हा कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला होता. तो बीकेसीला बँकेच्या बैठकीला गेला होता. वरिष्ठांनी त्याच्यावर कामचा दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याची कसून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.