मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष विविध यात्रा काढत आहे. शिवसेनेने सुद्धा जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे याच जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असून, तरुणांशी सवांद साधत आहे. अशाच एक आदित्य सवांद कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून, ज्यात शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या मुद्यावरून एक तरूण आदित्य ठाकरेंना शिवसेनेच्या खासदारांच्या खिशातील राजीनाम्यांची आठवण करून देत आहे. त्यामुळे या व्हिडिओची सोशल मिडियावर मोठी चर्चा होताना दिसत आहे.
यवतमाळमध्ये जन आशीर्वाद यात्रा आली असता आदित्य ठाकरे यांनी तरुणांशी सवांद साधला होता. यावेळी राहुल पाटील नावाच्या एका तरुणांने आदित्यांना विचारलेला प्रश्न सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यात हा तरूण म्हणत आहे की, गेल्या ६० वर्षात जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत तेवढ्या या ५ वर्षात झाल्या असून, हे सरकारचे अपयश आहे. शिवसेना सुद्धा सरकारमध्ये आहे, जर तुम्ही पाठींबा काढला तर हे सरकार पडेल. त्यामुळे तुम्ही सरकारला धारेवर धरत कर्जमाफी करता की काढू पाठींबा अशी भूमिका घ्यायला पहिजे, ज्याप्रमाणे तुम्ही पाच वर्षे खिशात राजीनामा ठेवून काढू का राजीनामा अशी भूमिका घेतली.
राहुल या तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देत आदित्य म्हणाले की, राजीनामा देणे एवढ सोपे नसते, कारण सत्तेत बसण्यासाठी काही कावळे तयारच असतात. असे काही छोटे- मोठे पक्ष आहेत. असे म्हणत आदित्य यांनी शिवसनेने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला.