मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाने महाराष्ट्रातील प्रचाराची रणधुमाळी थांबली. एकीकडे राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील नेते एकमेकांना भिडले असताना युवा नेत्यांनीही प्रचाराची धुरा सांभाळत मैदान गाजविल्याचे यंदाच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर आदी नेते चर्चेत होते.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी नियमित रॅली, सभा, प्रचारफेऱ्यांच्या जोडीने ‘आदित्य संवाद’ हा विशेष उपक्रम राबविला. पहिल्या टप्प्यात मुंबईसह पाच जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी सहा लाख युवकांशी थेट तर १५ युवकांशी डिजिटली संपर्क साधण्याचे उद्दिष्ठ ठेवले होते. नेहमीच्या राजकीय संवादाच्या स्वरूपाला या वेळी फाटा देण्यात आला होता. रॅम्प, चालत-बोलत साधलेला संवाद आणि उपस्थित युवा वर्गाकडून येणारे हरत-हेचे प्रश्न असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. मुंबईतील कार्यक्रमात तर त्यांना लग्न, डेटींगबाबतही थेट प्रश्न केला होता. प्रचार आणि अन्य कार्यक्रमादरम्यान अनेक लोक भेटत असतात. स्थळ वगैरे येतात का, पाहता का, लग्नाचे काय, असा सवाल करण्यात आला. त्यावर सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत आहे,‘आधी लगीन लोकसभा निवडणुकीचे आणि नंतर बाकी...’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न टोलविला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना आदित्य यांनी दिलेली उत्तरांचीही या प्रचारादरम्यान चर्चा झाली.
सुजात आंबेडकरांच्या निमित्ताने एक नवीनच नाव यंदाच्या प्रचारात समोर आले. प्रकाश आंबेडकरांच्या सोलापूर येथील प्रचाराची धुरा सुजातकडे होती. मुलाखती, भाषणे, प्रचार आणि राजकीय आरोपप्रत्यारोपातून प्रथमच सुजातची महाराष्ट्राला ओळख घडत होती. याशिवाय अन्य युवा नेतेही प्रचारात होते. यातील काही स्वत: उमेदवार होते तर काही संसदीय राजकारणात महत्वाची पदे अथवा जबाबदारी सांभाळत आहेत.