दोन पिढ्या आणि तीन संकर : राहुरी कृषी विद्यापीठानंतर राज्यातील दुसरे संशोधन विनेशचंद्र मांडवकर/विनायक येसेकर - नंदोरी/भद्रावती (चंद्रपूर)राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुमारे १० वर्षांपूर्वी संशोधित केलेल्या ‘फुले त्रिवेणी’ या प्रजातीच्या संकरित गायीच्या धर्तीवर ‘नंदोरी त्रिवेणी’ या गायीचा शोध लागला आहे. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील युवा पशुधन पर्यवेक्षक डॉ. राहूल घिवे यांना तब्बल साडेसहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा शोध घेण्यात यश मिळविले आहे.कृत्रिम रेतनातून हा शोध लावण्यात या डॉक्टरांना यश आले आहे. गीर, जर्सी आणि होलस्टन या तीन प्रजातीतून हे त्रिवेणी प्रजातीचे वासरू जन्मास आले आहे. गीर प्रजात भरपूर दूध देणारी आणि उष्ण वातावरणात टिकणारी आहे. तर, होलस्टन ही प्रजात सर्वात अधिक दूध देणारी आणि रोग प्रतिकारक म्हणून देशात ओळखली जाते. या तिन्ही संकरातून जन्मास आलेली प्रजात शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते, असा विश्वास डॉ. घिवे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील त्रिवेणी संगमातून जन्मास घातलेली ही केवळ दुसरी गाय असल्याचा त्यांचा दावा आहे. नंदोरी या गावात ही प्रजात जन्मास आल्याने ‘नंदोरी त्रिवेणी’ असे नाव ठेवण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी जन्मास घातलेल्या ‘फुले त्रिवेणी’ या गायीचे पोस्टर आपण पाहिले होते. संकरातून गायी फळविण्याचे काम पशुधन पर्यवेक्षक नेहमीच करतात. त्यामुळे अशी नवी प्रजात जन्मास घालण्याचा ध्यास आपण तेव्हापासूनच घेतला होता. नंदोरी गावात आपणास हा शोध लावण्यात यश आले. जन्मास आलेले वासरू आता महिन्याचे झाले असून उत्तम प्रतिकारशक्तीचे आणि बलवान आहे. त्याच्या मातेचे दुधही घट्ट आणि सकस आहे. -डॉ. राहुल घिवे, पशुधन पर्यवेक्षक, नंदोरीअसे आले यशनंदोरी येथील किसन गणपत लांबट यांच्याकडील गीर जातीच्या गायीवर डॉ. राहूल घिवे यांंनी हा प्रयोग केला. २००८ मध्ये जर्सी व्हॅक्सिनच्या माध्यमातून ही गाय २००९ मध्ये फळाला आली. मात्र गोऱ्हा झाला. तरीही प्रयत्न सुरूच ठेवले. २००९ मध्ये जर्सी व्हॅक्सिनच्या माध्यमातून ती पुन्हा २०१० मध्ये फळाला आली. यावेळी सुदैवाने गीर-जर्सी प्रजातीची संकरित कालवड जन्माला आली. ही संकरित कालवड तीन वर्षांची झाल्यावर २००३ मध्ये तिला होलस्टन फ्रिजियन व्हॅक्सीनने फळविण्यात आले. यातून ७ डिसेंबर २०१४ रोजी गीर-जर्सी-व्होलस्टन संकरित प्रजातीची ही त्रिवेणी गाय जन्माला आली.पशुसंवर्धन विभागाकडून संशोधन बेदखलहरहुन्नरी आणि कल्पक अधिकाऱ्यांचा शोध सरकार एकीकडे घेत असले तरी, पशुसंवर्धन विभाग मात्र डॉ. राहुल घिवे यांच्या संशोधनाप्रती बेदखल आहे. नंदोरी येथील श्रेणी दोनच्या पशुसंवर्धन रूग्णालयात सेवेत असलेले डॉ. घिवे सुरूवातीपासूनच नवनव्या उपक्रमात सक्रिय आहेत. २०१२ मध्ये गुणवंत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचे नाव गेले होते. मात्र नंतर ते मागे पडले. २०१११-१२ मध्ये तांत्रिक कार्याबद्दल त्यांचा पशुसंवर्धन आयुक्तांकडून सत्कार झाला होता. मात्र या वेळचे त्यांचे संशोधन उपेक्षित ठरण्याच्या मार्गावर आहे.
युवा पशुधन पर्यवेक्षकाने शोधली ‘नंदोरी त्रिवेणी’ गाय
By admin | Published: January 12, 2015 1:00 AM