पिंपरी : विक्रीतून चांगले पैसे मिळतील, या आशेने जिवंत हातबॉम्ब जवळपास महिनाभर घरी ठेवणाऱ्या तरुणास वाकड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला. मासेमारीसाठी गेलेल्या काळेवाडीतील एका लहान मुलाला नदीपात्रालगत महिनाभरापूर्वी एक वस्तू आढळली. कुतूहल म्हणून ती त्याने घरी नेली. त्याच्या शेजारी राहणाऱ्या विक्की अशोक सावंत (२५) याने ही वस्तू पाहिली. हा हातबॉम्ब आहे, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर विक्कीने त्या मुलाकडून तो काढून घेतला आणि सर्वांच्या नकळत त्याच्या विक्रीचा घाट घातला. त्याची किंमत तीन लाख रुपये त्याने निश्चित केली.हा हातबॉम्ब घेऊन तो ग्राहकांच्या शोधात फिरत राहायचा. खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. चतु:शृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डी. जी. वाळुंजकर यांनी शोध घेण्यास पोलीस पथक पाठविले. मागावर असलेल्या पोलिसांनी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास संशयावरून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे बॉम्ब सापडला. तो जिवंत हातबॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. विक्कीला अटक करण्यात आली असून, बॉम्ब खडकीतील अॅम्युनिशन फॅक्टरीत पाठविण्यात आला आहे.
पिंपरीत जिवंत बॉम्ब घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक
By admin | Published: September 10, 2015 2:24 AM