- राज चिंचणकर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी (ठाणे) नाट्यसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी ‘गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे?’ हा परिसंवाद रंगला आणि त्यात या विषयाशी संबंधित चर्चा झाली; परंतु परिसंवादाला अनेकदा विषयांतराची जी बाधा होते, त्याला हा परिसंवादही अपवाद ठरला नाही. तरुण प्रेक्षकांचे काय करायचे, यावर यात चर्चा होताहोता मूळ विषयावरून या परिसंवादाची गाडी आजकालच्या समीक्षेवर जाऊन घसरली. त्यावरूनच मग अधिक चर्वितचर्वण केले गेले. त्यामुळे गेला परिसंवाद कुणीकडे, असा प्रश्न उपस्थित झाला. या परिसंवादात ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, लेखक-दिग्दर्शक राजन बने, युवा रंगकर्मी अद्वैत दादरकर, नाट्यसमीक्षक जयंत पवार यांच्याशी दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. प्रेमानंद गज्वी : रंगभूमीवर तरुणांचे प्रश्न अभावानेच आले आहेत. एखादा अपवाद वगळता तरुणांशी संबंधित विषय रंगभूमीवर दिसतच नाहीत; मग तरुणवर्ग नाटकाकडे वळणार कसा? व्यावसायिक नाटकांकडे तरुण वळत नसले, तरी एकांकिका मात्र सगळ्या हाऊसफुल्ल असतात. पण, स्पर्धेनंतर या एकांकिकांतले लेखक पुढे कुठे जातात, हा प्रश्नच आहे. त्यांच्यापुढे सामाजिक जीवनातील प्रश्न असतात आणि तेही महत्त्वाचे असतात, हेही त्याचे कारण असू शकेल. केवळ तरुणच नव्हे; तर आज नाटकांना एकंदरच प्रेक्षक आहे कुठे, हासुद्धा प्रश्नच आहे. नाटकाकडे वळण्यासाठी प्रेक्षकांवर आता कम्पल्शन करायला हवे. जयंत पवार : रंगभूमीला तरुण प्रेक्षक आहे, असे मला वाटते. पण, हा मुद्दा लक्षात घेताना केवळ व्यावसायिक नाटकांचा विचार केला जाऊ नये. कारण, व्यावसायिक नाटकांकडे तरुणवर्ग वळलेला दिसत नसला, तरी एकांकिका किंवा प्रायोगिक नाटकांना तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे. आज तरुणांच्या अंगाने नाटके लिहिली गेली पाहिजेत, तसेच त्यांच्यासाठी मिनी नाट्यगृहे निर्माण करणेही गरजेचे आहे. बाहेरच्या समाजात जो तरुणवर्ग वाढतोय, तो व्यावसायिक नाटकांना यायला पाहिजेच, असे काही नाही. आजकाल घरांतही तरुणांची एक वेगळी स्पेस असते. हे लक्षात घेतले तर आज रंगभूमीवर सादर होणाऱ्या कौटुंबिक प्रकारच्या नाटकांना तरुणवर्ग येईलच, अशी अपेक्षा करता येणार नाही. आजच्या तरुणांनी स्वत:चा असा रंगमंच निर्माण केलेला आहे आणि तरुणवर्ग तिथे जात असतो. अद्वैत दादरकर : तरुणवर्गाला आकर्षित करण्यात नाटके कमी पडत आहेत. जरी तरुणांवरचे एखादे नाटक लिहिले, तर त्याला निर्माते मिळत नाहीत. निर्मात्यांचा भर हा कौटुंबिक नाटकांवर असतो. अशा या स्थितीत युवा नाटककारांच्या पुढे संभ्रम निर्माण झाला आहे. पण, जरी तरुण प्रेक्षक नाटकांना येत नसला, तरी आज नाटकांना येणारा चाळीशीचा प्रेक्षक हा मनाने तरुण होत असल्याचे मला वाटते. एकांकिका स्पर्धांतून खूप चांगले काम तरुणवर्गाकडून केले जात आहे. फक्त आजच्या तरुणांत डेप्थची कमतरता जाणवते. पूर्वीच्या नाटकांच्या तुलनेत आजच्या रंगकर्मींच्या भूमिकांतून एकंदर जगणे जोशात व्यक्त होताना दिसत नाही. पण, स्पर्धात्मक रंगभूमीतून तरुण प्रेक्षक आजही मिळत आहेतच. त्यामुळे मी अजिबात निराशावादी नाहीय. नाटकांच्या प्रयोगांची माहिती मिळण्याचे साधन आजही वृत्तपत्रे हेच आहे. पण, आजचा तरुण रोजचे वर्तमानपत्रही वाचत नाही. त्यामुळे आजची पिढी ज्या आधुनिक माध्यमांना जवळ करते, त्याचा विचार नाटकांच्या जाहिरातींसाठी करायला हवा. राजन बने : माझ्या मते सगळेच प्रेक्षक हे तरुण असतात. कोणत्याही विचारांची चौकट मोडून जगणारा प्रेक्षक हा तरुणच असतो. आज टीव्ही मालिकांकडे तरुण अधिक आकर्षित झाला आहे. पण, तरुणांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडता कामा नये. आजचा तरुणवर्ग हा आत्मकेंद्रित झालेला दिसतो. स्वत:चे काम करून झाल्यावर इतरांच्या नाट्यकृती ही मंडळी पाहतच नाहीत. नाटक आणि तरुणवर्ग हा मुद्दा एका बाजूला असतानाच निर्मात्यांच्या आघाडीवर काही वेगळेच सुरू असलेले दिसते. आजचे निर्माते हे फायनान्सर झाले आहेत. अशा निर्मात्यांपेक्षा रंगभूमीला तरुण निर्मात्यांची अधिक गरज आहे.