पुणे : उद्योजकता हे मृगजळ नाही. परंपरागत नोकरवृत्तीची मानसिकता बदलली आणि व्यापक ध्येयवाद, समर्पण, कष्ट, संघर्षरत राहणं, दूरदृष्टी ठेवली तर यश निश्चित मिळते. तरुणांनी नोकरीऐवजी व्यवसाय, उद्योगाची कास धरली, तर उद्योजकतेचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू होईल, असे प्रतिपादन ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष व खासदार विजय दर्डा यांनी केले. ‘लोकमत समूहा’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पुणे’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, पुणे आणि देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. शहर घडविणारी सगळी स्मार्ट मंडळी मात्र आज येथे बसली आहेत. पुण्याला घडविण्यात, वाढविण्यात मोलाची कामगिरी असलेल्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘ प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पुणे’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन आज येथे झाले आहे. शहराचे नियोजन करणारे आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझायनर्स, शहराचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर्स, वकील यांचा यात समावेश आहे. सेवाक्षेत्राबद्दल आज प्रामुख्याने बोलले जाते. आयटीसह अनेक विषयांची चर्चा होते; परंतु समाजाला खऱ्या अर्थाने सेवा देणारी ही सगळी मंडळी आहेत. कारण व्यावसायिकतेला सामाजिकतेची जोड त्यांनी दिली आहे. सृजनशीलता केवळ कलाकारांमध्ये असते नाही. येथे बसलेले सगळे ‘प्रोफेशल आयकॉन्स’ सृजनशील काम करीत आहेत. वेगळा विचार करणाऱ्या झपाटलेल्या लोकांचा हा गौरवसोहळा आहे. मला अॅपल कंपनीची एक जाहिरात आज आठवतेय...स्टिव्ह जॉब्ज या जाहिरातीत म्हणतो, ‘हे आहे झपाटलेल्यांसाठी, चाकोरीबाहेरचा विचार करणाऱ्यांसाठी, बंडखोरांसाठी, प्रश्न उभे करणाऱ्यांसाठी. त्यांच्यासाठी जे जगाकडे असामान्य नजरने पाहतात. त्यांना सद्यपरिस्थितीची पर्वा नसते. ते परिवर्तन आणतात. मानवजातीला प्रगतिपथावर नेतात. काही लोक त्यांना वेडे ठरवित असले, तरी आम्हाला त्यांच्यात दिसते प्रतिभा! कारण, ज्या लोकांना विश्वास असतो की, ते जगही बदलू शकतात..तेच जग बदलतात. दर्डा पुढे म्हणाले की, पुणे शहराच्या वाढीचा गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला, तर यातील बहुतांश ‘प्रोफेशनल आयकॉन्स’चे त्यामध्ये भरीव योगदान असल्याचे दिसते. ‘स्टार्ट अप इंडिया’ची चर्चा आज होत आहे; मात्र येथील अनेकांनी नवकल्पनांतून भारताला पुढे नेले आहे. नुकतेच इस्रोने अवकाशात जे उपग्रह सोडले आहेत, त्यामध्ये पुण्यातील तरुणांनीही हातभार लावला आहे व एक स्वतंत्र उपग्रह तयार करून सोडला आहे. पुण्याचे हे वेगळेपण दिसून येत आहे. उद्यमशीलता आणि कल्पकता यातून केवळ स्वत:चे आयुष्य समृद्ध केले नाही, तर पुणे शहराच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासालाही गती दिली आहे. मळलेली पायवाट सोडून जोखीम पत्करून व्यवसाय सुरू करण्याला एक मूल्य आहे. ‘प्रोफेशनल आयकॉन्स’ ही चैतन्यदायी शब्दचित्रे आपण नोकरी मागणारे नव्हे; देणारे हात घडविणारे ‘आयकॉन्स’ आहात. कल्पकता, सृजनशीलता, साहस व परिश्रम करण्याची तयारी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अंतकरणापासूनची हृदयातील आग हेच केवळ भांडवल. त्यावर आयुष्य घडविणे सोपे नाही.पण, येथील बहुतांश ‘आयकॉन्स’ने ते सिद्ध केले आहे. ‘प्रोफेशल आयकॉन्स आॅफ पुणे’ या कॉफीटेबल बुकमध्ये केवळ उद्योजकांची माहिती किंवा नफ्या-तोट्याचा ताळेबंद नाही, तर चैतन्याने उसळणारी सजीव शब्दचित्रे आहेत, असे गौरवोद्गार खासदार विजय दर्डा यांनी काढले.
तरुणांनी धरावी उद्योजकतेची कास
By admin | Published: June 27, 2016 1:13 AM