तरुणांनो...कल्पकता दाखवा, मुख्यमंत्री व्हा! काँग्रेसची ऑफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:05 AM2019-08-26T06:05:53+5:302019-08-26T06:06:04+5:30
युवक काँग्रेसचा उपक्रम; 'मैं भी नायक’ स्पर्धेचे आयोजन
मुंबई : तुमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, तुम्हाला उत्तम सादरीकरण करता येते, तुमच्या डोक्यात महाराष्ट्राच्या विकासाच्या भन्नाट कल्पना आहेत, तर चला मग तुम्हीही होऊ शकता एका दिवसाचे मुख्यमंत्री! महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या 'मैं भी नायक’ या स्पर्धेद्वारे राज्यातील कल्पक युवकांना ही संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ‘वेक अप महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत देशात प्रथमच ‘युवकांचा जाहीरनामा’ साकारत आहे. याअंतर्गत ‘मैं भी नायक...सीएम फॉर ए डे’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या या उपक्रमात स्पर्धकांना महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात विविध सूचना, कल्पना आणि विचार पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, वक्तृत्व, अभिनय, एकपात्री या माध्यमातून सादर करायचे आहे. ६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी तर ८ सप्टेंबरला जिल्हास्तरीय स्पर्धा होईल. जिल्हास्तरावरील २ विजेत्या स्पर्धकांना 'तिकीट
टू विधानसभा' मिळणार असून मुंबईत फायनल राउंड होणार आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या ५ विजेत्यांना ‘सीएम फॉर ए डे’ (एका दिवसाचे मुख्यमंत्री) बनून पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर प्रत्यक्ष दिवसभर राहून कामकाज पाहण्याची, विकासावर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील हल्लीचे तरुण अत्यंत कल्पक व चौफेर सारासार विचार करणारे आहेत. त्यांच्याकडे अनेक भन्नाट कल्पना असतात, पण सर्वांनाच त्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. अशा कल्पक युवकांना ‘मैं भी नायक’ या स्पर्धेतून संधी देणार आहोत. विजेत्यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करता येणार आहे. अशा स्पर्धेतून होतकरू तरुणांना भविष्यात राजकारणात संधी मिळू शकते.
- सत्यजीत तांबे, अध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेस