पिंपरी : ज्या भागात फ्री वायफाय असेल, त्या भागात एका ठिकाणी जमायचे आणि एकमेकांना पासवर्ड की देऊन वायफाय वापरण्याचे फॅ ड शहरात सुरू झाले आहे. रात्रीच्या वेळी उद्याने, सोसायटीच्या भागात मित्रांचा घोळका एका ठिकाणी जमू लागला आहे. ज्या ठिकाणी अॅक्सेस मिळेल तेथे वायफाय सुरू करायचे आणि तास न् तास फ्री वायफायचा वापर करायचा. वायफाय मोफत क्षेत्रात आल्यानंतर मुलांना मध्यरात्री कधी झाली हे समजत नाही. इंटरनेटद्वारे अनेक चित्रपट, तसेच व्हिडीओ व फाइल्स डाऊनलोड करतात. फ्री वायफायचा कोड खूप मोठ्या प्रमाणात शेअर झाला तर तो आटोक्यात आणणे अवघड आहे. कारण तो एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत जातो. यामुळे याची नोंद होत नाही. एखादा गुन्हा घडल्यास फ्री वायफाय नेटचा वापर करून केला असल्यास तो शोधणे अवघड होते. फ्री वायफायचा पासवर्ड सुरक्षित राहिला नाही, हे यावरून निष्पन्न होते. रात्रीच्या वेळी असे मुलांचे घोळके ज्या ठिकाणी असतील त्या भागात नियंत्रण व सुरक्षितता ठेवणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस असे घोळके वाढत गेल्यास सोशल मीडियातून वाढणाऱ्या गुन्ह्यांवर वचक बसविणे अवघड होईल. यासाठी वायफाय धोक्याचे ठरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे आर्थिक बाबींची चणचण जाणवत असते. अशा वेळी नेट वापरण्यासाठी पैसा अपुरा पडतो. अशा वेळी फ्री वायफायचा लाभ घेणे अपरिहार्य ठरते. यामुळे मित्रमंडळीही एकमेकांना फोन करून फ्री वायफाय वापरण्यासाठी आमंत्रण देतात. अमर्यादित नेट अॅक्सेस असल्याने कितीही वेळ वापरल्यास पैसे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही.सध्या यमुनानगर, निगडी, चिंचवड, पिंपरी आदी भागात फ्री वायफायचा लाभ घेण्यासाठी मुले एकत्र जमत आहेत. मात्र, वायफाय वापरण्यासाठी सुरुवातीला राउटर सेट केलेला असतो. त्यामध्ये यूआरएल व डोमेननेम सेटअप असतो. वायफाय वापरण्यासाठी मोबाइल नंबर सेट करून घ्यावा लागतो. त्यानंतर पासवर्ड की मिळते, त्यातून संबंधित राउटरमध्ये मोबाइलसंबंधी माहिती जमा होते. त्यावरुन राऊटरवर कितीजण वायफायचा लाभ घेत आहेत हे समजते. शासकीय वेबसाइट्स किंवा अश्लील वेबसाइट या काही वायफाय क्षेत्रातच ब्लॉक केलेल्या असतात. मात्र, सर्व ठिकाणी पोर्न साईट्सचा अॅक्सेस वायफायमधून बंद केलेला असतोच असे नाही.(प्रतिनिधी)
फ्री वायफायमुळे तरुणांचे घोळके
By admin | Published: April 06, 2016 1:15 AM