मुंबई : जनसामान्य आणि कष्टकरी वर्गासाठी काम करताना सहकारातील योगदानाने अपना बँकेने आदर्श निर्माण केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपना बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, कष्टकरी गिरणी कामगारांनी एकत्रित येऊन कष्टकरी वर्गासाठी सुरू केलेल्या अपना बँकेचे कार्य आदर्शवत आहे. या विचारांच्या जोरावर ही बँक काम करून लवकरच १० हजार कोटींची उलाढाल करेल. सामान्य माणसे एकत्रित येऊन असामान्य काम करू शकतात, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. अपना बँक पुढील काळातही कष्टकरी वर्गासाठी मोठे कार्य करत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.बँकेच्या जडणघडणीची माहिती देताना केंद्र सरकारच्या कॅशलेस चळवळीला पूरक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सेवा देत असल्याचे चाळके यांनी सांगितले. या वेळी बँकेच्या वाटचालीत योगदान दिलेल्या व्यक्तींचे चाळके यांनी कृतज्ञापूर्वक आभार मानले. या वेळी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नोटाबंदीच्या काळात केलेल्या कामाचा उल्लेख करून सरकारकडून सहकारी बँकांबाबत दुजाभाव न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कोंडूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वाणिज्य प्रतिनिधी)
जनसामान्यांसाठी काम करणारी अपना बँक - मुख्यमंत्री
By admin | Published: April 05, 2017 2:33 AM