पुन्हा दिवाळी : जयताळा ते फुटाळा अन् महाल ते इंदोरा जल्लोषनागपूर : आपल्या नजरेसमोर लहानाचा मोठा झालेला आणि एकापाठोपाठ एक प्रगतीची शिखरे सर करीत जाणारा नागपूरकरांचा लाडका देवेंद्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. कायम सामान्य वाटणारा आणि नागपूरकरांशी व्यक्तिगत पातळीवरही संवाद साधणारा देवेंद्र मुख्यमंत्री पदावर आरुढ होणार म्हटल्यावर साऱ्याच नागपूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. उपराजधानीसाठी भूषणावह आणि आनंदाची असणारी ही वार्ता सायंकाळी नागपुरात आली. नागपूरकरांनाही या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होतीच. मग काय....देवेंद्र मुख्यमंत्री होणार असल्याच्या आनंदात नागपूरकरांनी चक्क पुन्हा दिवाळीच साजरी केली. नागपुरात सर्वत्र फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळला. रस्त्यारस्त्यांवर आणि चौकाचौकात फटाके फोडण्यात आले. नागपुरातला नेता मुख्यमंत्री होणार असल्याचा हा आनंद नागपूरकरांची निकोपता दाखविणाराही होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचा आनंद भाजपच्या कार्यकर्त्यांना झाला तेवढाच इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही झाला. या आनंदामागे नागपूरकर असण्याची आपुलकी आणि जवळीक होती. त्यामुळे देवेंद्र मुख्यमंत्री होण्याच्या आनंदात सारेच नागपूरकर उत्साहाने, आनंदाने सहभागी झाले. जयताळा ते फुटाळा आणि महाल ते इंदोरा असा सर्वत्र केवळ जल्लोषच जल्लोष शहरात दिसत होता. कुणी एकमेकांना मिठाई देत होते तर कुणी परस्परांना पेढे भरवित होते. फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलाल उधळीत ही आनंदाची वार्ता देताना सारेच ‘आपला देवेंद्र सी. एम. झाला’ अशा कौतुकाने भारलेल्या शब्दात आपला आनंद व्यक्त करीत होते. (प्रतिनिधी)
आपला देवेंद्र सी.एम.
By admin | Published: October 29, 2014 12:45 AM