मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्याच कामाकाजाची सुरुवात विरोधकांच्या गोंधळाने झाली आणि या गोंधळातच कामकाज आटोपले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. माईकमधून बोलण्यास सुरुवात करूनही त्यांचा आवाज कमी यायला लागल्याने भाजपचे आशीष शेलार यांनी इशाऱ्याने मोठ्याने बोला असे सुचविले. त्यावर ‘तुमच्या आवाजाने माझे कान बधीर झाले आहेत’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हाणला.सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे सदस्य विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले. हे सरकार फसवे असल्याचा आरोप करीत त्यांनी शेतकऱ्यांना मदतीबाबत घोषणा दिल्या.सभागृहात फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेचा मुद्दा व महिला अत्याचारांच्या वाढत असलेल्या घटनांप्रश्नी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी करत याबाबत स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास अनुमती नाकारत पुढचे कामकाज पुकारले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभाग, पणन विभाग, अर्थविभागाचे असे मिळून ६ अध्यादेश पटलावर ठेवले. त्याचबरोबर २४ हजार ७२३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. माजी आमदार पुष्पसेन सावंत आणि किसनराव राऊत यांना आदरांजली वाहून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
तुमच्या आवाजाने माझे कान बधिर झाले; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:38 AM