मुंबई- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बुधवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ‘आपले सरकार’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दररोज 2 ते 5 लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी आपले सरकार या वेबसाईटवर जाहीर केली आहे.
शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे तपासा- aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करा.
- इथे वरच्या कोपऱ्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील, तुम्हाला शक्य ती भाषा निवडा.
- जर इंग्रजी सिलेक्ट केला तर डाव्या बाजूला, Chatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana – Year 2017 हे दिसेल. त्यावर क्लिक करा.जर मराठी सिलेक्ट केलं तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – वर्ष २०१७ हे दिसेल.
- त्यावर क्लिक करा. उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक, ब्रँच हे सर्व निवडायचं आहे.
सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्ही अशा प्रकारे तपासू शकता.
'आपले सरकार' संकेतस्थळावरील महत्त्वाचे मुद्देया योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकरी ज्यांनी दि. १.४.२००९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतले व असे कर्ज दि. ३०.६.२०१६ रोजी थकीत आहे अशा शेतक-यांचे मुद्दल व व्याजासह रु. १.५० लाख या मर्यादेत कर्ज काही निकषाच्या अधिन राहून माफ करण्यात आले आहे. तसेच रु. १.५० लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजना (OTS) योजनेअंतर्गत रु. १.५० लाख एवढया रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तथापि, यासाठी अशा शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण परतफेड बँकेस जमा केल्यानंतर शासनामार्फत रु. १.५० लाख अदा करण्यात येईल.
या योजनेमध्ये सन २०१५ -१६ व २०१६ -१७ या वर्षातील घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३०.६.२०१६ व दि. ३०.६.२०१७ अनुक्रमे परतफेड केल्यास अशा शेतक-यांनाही पीक कर्जाच्या २५% अथवा रु. २५००० लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये सन २०१२-१३ ते २०१५-१६ वर्षातील पुनर्गठन केलेल्या रकमेची थकबाकी असल्यास किंवा त्यांची नियमित परतफेड केल्यासही शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. सदर कर्जमाफी योजनेचा राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतक-यांना दिलेल्या कर्जास लागू राहील.