मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविलेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आमदार सेवक वाघाये यांच्यात मंगळवारी वाद झाला. ‘तुम्ही या बैठकीसाठी निमंत्रित नाही’, असे पटोले यांनी म्हटल्याने वाघाये चांगलेच संतापले.
लोकसभा मतदारसंघनिहाय अशा बैठका टिळक भवनात दिवसभर झाल्या. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही यावेळी उपस्थित होते. सुत्रांनी सांगितले की, भंडारा - गोंदिया मतदारसंघाची बैठक सुरू होताच माजी आमदार वाघाये हे तेथे आले. मात्र, ‘आपण बैठकीसाठी निमंत्रित नाही, बाहेर जा,’ असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी त्यांना सांगितले.
‘मी माजी आमदार आहे. इतर माजी आमदारांनाही बोलावलेले आहे. शिवाय, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी नाना गावंडे यांनी मला बैठकीसाठी बोलाविले होते, म्हणून मी आलो,’ असे उत्तर वाघाये यांनी दिले. मात्र, पटोले ऐकायला तयार नव्हते. आपण बैठकीतून जा, असे त्यांनी वाघाये यांना बजावल्याची माहिती आहे.
वाघाये तणतण करत निघून गेले. जाताना त्यांनी, आपल्याला मुद्दाम डावलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष आकसाने वागत आहेत, असे ओरडून सांगितले. माहिती अशी आहे की, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
यवतमाळ-वाशिम आपल्याकडेच घ्यायवतमाळ - वाशिम मतदारसंघ कोणत्याही स्थितीत आपल्याकडेच घ्या, असा आग्रह तेथील काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत धरला. भावना गवळी आणि संजय राठोड हे शिवसेनेचे या मतदारसंघातील मोठे नेते आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाहीत. त्यामुळे आता काँग्रेसनेच लढले पाहिजे, असा आग्रह नेत्यांनी धरला.
सांगलीसाठी मोठा दबावसांगलीची जागा महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडेच राहिली पाहिजे, अशी जोरदार मागणी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केली. हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. काँग्रेसने विशाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी आम्ही सर्वानुमते केलेली आहे, असे जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.