ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. आजचे वास्तवही तसेच आहे. श्रीमंतीमध्ये तर, पुण्याची घोडदौड वेगाने चालू आहे.मागच्या काहीवर्षात पुण्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे. पुण्यात झालेल्या विकासाने इथल्या श्रीमंतीतही भर घातली आहे. आजच्या घडीला पुणे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशातील श्रीमंत शहर बनण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार संपूर्ण देशामध्ये पुण्यात श्रीमंतांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे.
नुकत्याच सार्वजनिक झालेल्या 'द वेल्थ रिपोर्ट'च्या अहवालानुसार वर्षभरात पुण्याच्या धनिकांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. 89 देशाच्या 125 शहरातील गर्भश्रीमंतांची माहितीची नोंद ठेवणा-या नाईट फ्रँक या जागतिक संपत्ती संस्थेने हा अहवाल दिला.
जगातील आघाडीच्या 900 खासगी बँका, संपत्ती सल्लागारांनी दिलेली माहिती एकत्रित करुन हा द वेल्थ रिपोर्ट बनवण्यात आला आहे. रिपोर्टनुसार मागच्यावर्षीच्या तुलनेत पुण्यामध्ये श्रीमंतांच्या संख्येमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली. पुढच्या दशकभरात पुण्यात श्रीमंतांची संख्या अशीच वाढत राहील असे अहवालात म्हटले आहे.
एकाचवेळी सर्व सेक्टरमध्ये प्रगती सुरु असल्यामुळे हे शक्य झाले आहे. कारखान्याचे शहर ही ओळख बदलून पुणे आता तंत्रज्ञानाचे शहर बनले आहे. जागांच्या परवडणा-या किंमती, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी यामुळे पुण्याचा सर्वांगीण विकास सुरु असून श्रीमंतांच्या संख्येमध्ये भर पडत आहे असे नाईट फ्रँकचे मुख्य अर्थतज्ञ आणि राष्ट्रीय संचालक डॉ. समांतक दास यांनी सांगितले.