ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 14 - संसाराच्या व्यापाला कंटाळून एका तरुणाने पत्नी आणि मुलाची गळा आवळून हत्या केली त्यानंतर स्वत:ही रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री सातारा परिसरात घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा तर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तरुणाच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली.
संसाराला कंटाळून पत्नी आणि मुलाला संपवून स्वत: आत्महत्या करीत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले. आम्रपाली साळवे (२४), कुणाल साळवे (साडेतीन वर्ष)अशी खून झालेल्या मायलेकांची नावे आहेत तर विनोद श्रीरंग साळवे(३०,सर्व रा. शंकरनगर, सातारा परिसर)असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे.
सातारा पोलिसांनी सांगितले की, सातारा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सतीश टाक यांनी सांगितले की, आम्रपाली आणि विनोद साळवे हे दाम्पत्य दोन ते तीन महिन्यांपूर्वीच पुणे येथून औरंगाबादेत स्थायिक झाले. पुणे येथे विनोद वॉचमन म्हणून काम करायचा . तेथील नोकरी गेल्याने हे दाम्पत्य औरंगाबादेत परतले.
शंकरनगर येथे त्याचे आईवडिलांचे स्वत:चे घर आहे. येथे आल्यापासून विनोद बेरोजगार आहे. शुक्रवारी रात्री आम्रपाली आणि कुणाल यांची राहत्या घरी गळा आवळून खून केल्यानंतर त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यानंतर तो घरातून गायब झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आम्रपाली आणि कुणाल यांना घाटीत दाखल केले.
रात्री ८.५० च्या सुमारास डॉक्टरांनी मायलेकांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश टाक आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट दिली.
आणी त्याने स्वत:लाही संपवले...
शिवाय आम्रपालीचा पती विनोद हा फरार झालेला असून, त्याचा मोबाईलही बंद लागत आहे. यामुळे त्यानेच मायलेकाचा खून करून तो फरार झाला असावा, असा संशय पोलिसांना होता.पोलीस त्याचा शोध घेत असतानाच रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास विनोदने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी मृत विनोदचे प्रेत घाटीत दाखल केले.