मुंबई : देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते तेही गेले आणि ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून उद्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.
गांधी भवन येथे पत्रकारांशी सत्यजित तांबे यांनी संवाद साधला. यावेळी मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे. रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून ही बेरोजगारी वाढण्यास केंद्रातील भाजपा सरकारची आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत आहे. देशातले उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत भर पडत असून फोर्डने नुकतेच भारतातील उद्योग बंद केल्याने प्रत्यक्ष ४ हजार तर अप्रत्यक्ष जवळपास ४० हजार लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.
सुशिक्षित तरुणांनी पकोडे तळावे, चहाच्या टपऱ्या चालवाव्या, बुट पॉलीश करावी अशी मोदी व भाजपाची इच्छा आहे. त्यामळे तरुणांची फसवणूक करणाऱ्या मोदींना वाढदिवसाची भेट म्हणून राज्यभर सर्व जिल्हा आणि तालुकास्तरावर उद्या शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी आंदोलनरुपी भेट दिली जाणार आहे, असे सत्यजित तांबे म्हणाले. तर मुंबई शहरातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई युवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगारी दिवस पाळला जाणरा असून मुंबई शहरातील विविध भागांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी यांनी सांगितले. युवकांना प्रवक्त्यांची संधी देण्यासाठी युवक काँग्रेसकडून 'राष्ट्रीय भाषण स्पर्धा'...तरुणांमधून उत्तम वक्ते तयार व्हावे यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने 'यंग इंडिया के बोल' ही राष्ट्रीय भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशभर विविध राज्यात जिल्हा आणि तालुका स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतून उत्कृष्ट भाषण करणाऱ्या वक्त्यामधून युवक काँग्रेसचे प्रवक्ते बनण्याची संधी दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. उत्कृष्ट भाषण कला असणाऱ्यांना युवक काँग्रेसकडून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
महागाई, कोरोना परिस्थिती हाताळण्यातील मोदी सरकारचे अपयश, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन, कृषी विरोधी काळे कायदे, हे भाषणाचे विषय असतील अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी हरपालसिंग, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, सुबोध कुमार आदी उपस्थित होते.