लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष व इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेत कुणाल नितीन राऊत हे आघाडीवर आहेत. त्यांना ५ लाख ४८ हजार २६७ मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राऊत यांच्यानंतर शिवराज मोरे (३ लाख ८० हजार ३६७) आणि शरण बसवराज पाटील (२ लाख ४६ हजार ६९५) यांना मते मिळाली.
अध्यक्षपदासाठीची मुलाखत लवकरच नवी दिल्लीत होईल आणि त्यानंतर अध्यक्षपदावरील निवड जाहीर करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी एकूण १४ जण रिंगणात होते. अध्यक्षपदापासून वंचित राहिलेल्या काही जणांना उपाध्यक्षपद मिळेल. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अव्वल असलेले कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. या आधीही ते प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी राहिले आहेत. शरण पाटील हे माजी मंत्री बसवराज पाटील यांचे पुत्र आहेत. शिवराज मोरे हे एनएसयूआयचे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.
सरचिटणीसपदी जिंकलेले याज्ञवल्क्य जिचकार हे माजी मंत्री दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र आहेत. शिवानी वडेट्टीवार या ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत.
वडेट्टीवार, जिचकार, अक्षय जैन यांची नियुक्तीसरचिटणीसपदाच्या निवडणुकीत तब्बल २४६ उमेदवार होते. त्यातील ३३ जण या पदासाठी निवडून आले आहेत. त्यांची नावे अशी - अभिजित चव्हाण, शिवानी वडेट्टीवार, याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार, परिक्षित जगताप, अनुराग भोयर, धीरज पाटील, अक्षय जैन, सुधीर जाधव, केतन ठाकरे, श्रीनिवास नीलमवार, कपिल ढोके, प्रवीण बिराजदार, जयदीप शिंदे, हर्षाली म्हात्रे, दीपाली ससाणे, अतुल पेदेवाड, आसिफ शेख, पंकज सावरकर, सुमीत भोसले, वीरेन चोरघे, अरमान बद्रु जमा, मधुकर नाईक, गौरव पानगव्हाणे, अनंत चव्हाण, डॉ. प्रवीणकुमार जांभुळे, राहुल माणिक, अमृता भट्टड.