युवक काँग्रेसने श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे : बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 08:38 PM2020-01-22T20:38:08+5:302020-01-22T20:38:52+5:30
टिळक भवन येथे बुधवारी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली.
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या वाटचालीत युवक काँग्रेसचाही मोठा वाटा असून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रद्धा, सबुरी व सातत्य ठेवून काम करावे असे आवाहन करुन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने केलेल्या कामाचे कौतुक केले.
टिळक भवन येथे बुधवारी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी हरपालसिंग, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमित झनक, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आ. माणिकराव जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त शिवराज मोरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला मार्गदर्शन करताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी युवक काँग्रेसने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षासमोर कठीण परिस्थिती असताना युवक काँग्रेसने सुपर ६० उपक्रम राबवून ६० मतदारसंघात नियोजनबद्ध काम केले याचा फायदा झाल्याचे ते म्हणाले. यापुढेही मतदारसंघ बांधणीच्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक गावात संघटना पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी गाव तिथे युवक काँग्रेस, झाली पाहिजे त्यासाठी काम करा. सातत्याने संघटनेसाठी योगदान देण्याची गरज आहे. तुमच्यातून उद्याचे नेतृत्व उदयास येणार आहे, असे थोरात म्हणाले.
काँग्रेसला एक विचार आहे, इतिहास आहे, परंपरा आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणार आहे. त्यामुळे काँग्रेस विचार तरुण पिढीमध्ये रुजवण्यासाठी कार्यशाळांची गरज आहे. जातीधर्मात फूट पाडणारा भाजपाचा विचार घातक असून पुरोगामी विचार पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी काम करा, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे. याचबरोर, युवक काँग्रेसने तळागाळापर्यंत जनतेची कामे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.