काँग्रेसचे तरुण उर्मिला मातोंडकरांसोबत; सत्यजीत तांबेंनी केलं पक्षश्रेष्ठींना सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:21 PM2019-09-11T12:21:06+5:302019-09-11T12:22:49+5:30
उर्मिला मातोंडकरांना मिळालेली वागणूक निषेधार्ह; युवक काँग्रेस उर्मिलांच्या पाठिशी
नवी दिल्ली: अवघ्या सहा महिन्यांमध्ये काँग्रेसला रामराम करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस सरसावली आहे. उर्मिला यांना मिळालेली वागणूक निषेधार्ह असल्याचं युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेस ठामपणे उर्मिला यांच्या पाठिशी असल्याचंदेखील तांबे म्हणाले. काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढलेल्या उर्मिला यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी उर्मिला यांच्या राजीनाम्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलं. 'उर्मिला मातोंडकर यांच्याशी फारसा परिचय नाही. मात्र त्या विचारधारेवर ठाम आहेत. याची मला कल्पना आहे. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत. उर्मिला यांना पक्षात मिळालेली वागणूक निषेधार्ह आहे,' अशा शब्दांमध्ये तांबे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य केलं.
काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई न झाल्याचं म्हणत मातोंडकर यांनी काल पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची तक्रार मी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याउलट त्यांनाच पदं देण्यात आली नाही, अशा शब्दांमध्ये मातोंडकर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
मला पक्षांतर्गत राजकारणात कोणताही रस नाही. त्यामुळेच मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं मातोंडकर म्हणाल्या. 'काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी मी मिलिंद देवरा यांच्याकडे पत्रातून केल्या होत्या. ते पत्र गोपनीय राहणं आवश्यक होतं. मात्र ते पत्र माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलं. यानंतरही अनेकदा मी नाराजी व्यक्त केली. परंतु त्याची कोणतीही दखल घेण्याचत आली नाही. पक्षांतर्गत राजकारणात मला काडीमात्र रस नाही. त्या राजकारणात माझा वापर होऊ नये, यासाठी मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे,' अशा शब्दांमध्ये उर्मिला यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर जोरदार टीका केली. आपण सामाजिक कार्यात यापुढेही सक्रीय राहू, असं मातोंडकर यांनी स्पष्ट केलं.