प्रदीप शिंदे - कोल्हापूर -वृद्धांच्या एस.टी. बस पासच्या सवलतीचा तरुणवर्गच अधिक फायदा घेत असल्याने एस़ टी़ महामंडळाला महिन्याला हजारो रुपयांचा फटका बसत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जोतिबा-कोल्हापूर एस.टी.मधून प्रवास करणाऱ्यांकडून चार ज्येष्ठांची बोगस ओळखपत्रे सापडली आहेत. त्यामुळे बोगस विद्यार्थी ओळखपत्रापाठोपाठ ज्येष्ठांचेही बोगस ओळखपत्र सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात एस. टी. सवलत घेणाऱ्या अपंगाची बोगस ओळखपत्र सापडली होती, तर काही दिवसांपूर्वी रंकाळा स्टॅण्ड येथून बोगस विद्यार्थी पासचे वितरण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याची चेैकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागाच्यावतीने महामंडळाकडून जिल्ह्यात अपंग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी पासची तपासणी मोहीम सुरू केली आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकांचे स्थानक प्रमुख अभय कदम यांनी जोतिबा-कोल्हापूर गाडीची तपासणी केली असता त्यांना बसमध्ये प्रवाशाकडून ही बोगस ओळखपत्र सापडली. यावेळी प्रवाशांनी उडवाउडवाची उत्तरे दिली. मात्र, कदम यांनी ओळखपत्रावरील जन्मतारीख, पत्ता असे प्रश्न विचारला असता त्यांना काहीच उत्तरे देता न आल्याने त्यांनी त्यांच्याकडून ओळखपत्र जप्त केली. नवऱ्यापेक्षा बायको दहा वर्षांने मोठी...ज्येष्ठ नागरिकांचा पुरावा दाखविण्यासाठी प्रवाशांपैकी तिघांकडे भारतीय निवडणूक आयोगाद्वारे दिले जाणारे ओळखपत्र दाखविले. त्यामध्ये गंगाबाई पांडुरंग हुगे व रक्मिणीबाई श्रीखंडराव हुगे यांच्या निवडणूक ओळखपत्रावर रंगीत फोटो लावला आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे जिल्हा व गाव वेगवेगळे दाखविले आहे. पांडुरंग खुशालराव हुगे व त्यांच्या पत्नी गंगाबाई पांडुरंग हुगे यामध्ये गंगाबाई यांचे निवडणूक ओळखपत्र सापडले. त्यांचे वय पतीपेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे. जोतिबा-कोल्हापूर या एस.टी.बसमधून प्रवास करताना काही लोकांनी ज्येष्ठ नागरिक असल्याचा पुरावा वाहकाला दाखविला. त्यावेळी त्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यांच्याकडे दाखविलेला पुरावा पाहिला असता तो बोगस असल्याचे आढळले. या गाडीत अन्य काहीजणांकडे तपासणी केली असता चौघांची अशी ओळखपत्रे जप्त करण्यात आली. आता यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. - अभय कदम, स्थानकप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर.
‘तरुणांना’ म्हातारपणाचे ‘डोहाळे’
By admin | Published: January 15, 2015 11:13 PM