शिवराज यादव -
पुणे, दि. 24 - लाखो वारकरी दरवर्षी वाट पाहत असलेले पंढरपुरची वारी आता सुरु होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक ऐश्वर्य या वारीतून अनुभवायला मिळतं. अनेक वारकरी आपली अनेक वर्षांची परंपरा जात वारीत सहभागी होत असतात. मात्र ही वारी हायटेक करण्याचं काम पुण्यातील तरुण करत आहेत. फेसबूक दिंडीच्या माध्यमातून सुरु केलेला हा उपक्रम या तरुणांनी इथपर्यंतच न थांबवता आता सामाजिक कार्यातही सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून संपुर्ण जगापर्यंत पोहचवण्याचं काम हे तरुण फेसबुक दिंडीच्या माध्यमातून करत आहेत. मात्र यावेळी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचं काम हे तरुण करत आहेत.
श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाच्या सहकार्याने व सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखालील 'एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती' यांचे तर्फे पालखी सोहळ्याच्या काळात 'फेसबुक दिंडीला' लाईक/जॉईन करणा-या प्रत्येक ई वारक-यामागे एक रुपया अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. सोबतच ऑनलाईन तसेच वारीत चालणाऱ्या वारकरी शेतकरी मित्रांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
'राज्यातील पाणी टंचाईची तीव्रता विचारात घेता यंदा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती संगोपन आणि जनजागृती मोहीम सोबतच काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आपण हे पाऊल उचलल्याचं', फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी सांगितले आहे. 'जमा झालेली मदत जलसंधारणाचे काम करणा-या सामाजिक संस्थेस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून जगभरातील भाविकांपर्यंत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचविण्याचे यंदाचे सहावे वर्ष असून दरवर्षी या व्हर्च्युअल दिंडीला भेट देणा-या भाविकांच्या संखेत लक्षणीय वाढ होत असल्याचेही', ते म्हणाले.
फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर कार्यरत आहेत.