कामशेत : येथील स्थानकावर रेल्वे रुळांच्या मधोमध झोपून अंगावरून रेल्वेगाडी गेल्याचा व नंतर तो तरुण उठून नाचण्याचा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओमुळे लोहमार्ग पोलिसांची तारांबळ उडाली आहे.कामशेत येथील रेल्वे स्टेशनच्या नदीकडेच्या रेल्वेट्रॅकवर फलाटाच्या सुरुवातीलाच काही तरुणांनी हुल्लडबाजी करून जीव धोक्यात घालून व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ व्हॉट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मीडियावर अपलोड केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. लोहमार्ग पोलीस व रेल्वे प्रशासनाला अनेक जण या प्रकरणाविषयी जाब विचारत आहेत. लोहमार्ग पोलिसांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले, की काही दिवसांपासून काही तरुण नशेच्या धुंदीत रेल्वे स्टेशन परिसरात वावरत होते. त्यांनीच हे कृत्य केले असून, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. अशा प्रकारचे स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.या प्रकारच्या स्टंटमुळे रेल्वे प्रशासनाला अनेक ठिकाणांवरून विचारणा होत आहे. लोहमार्ग पोलीस व रेल्वे प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने किती निष्क्रिय आहे, हे दिसून येते, अशी टीका होत आहे.(वार्ताहर)
तरुणाच्या स्टंटबाजीमुळे तारांबळ
By admin | Published: May 30, 2016 1:17 AM